करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचे चित्र आजही कोल्हापूर जिल्ह्यात दिसले. सोमवारी जिल्ह्यात ६८ करोनाबाधित रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. या रुग्णांची संख्या ४०९ इतकी झाली आहे. दरम्यान, सहा रुग्णांनी करोनावर मात केल्याचे सकारात्मक चित्रही आज पाहायला मिळाले. काल तीनशे आकडा ओलांडणाऱ्या कोल्हापुरात आज सलग दुसऱ्या दिवशी नवा उच्चांक तयार झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. दररोज काही रुग्णांची भर पडत आहे. हे चित्र सोमवारी कायम राहिले. आज संध्याकाळपर्यंत ६८ करोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यामुळे काल ३४१ असणारी करोनाबाधितांची संख्या आज ४०९ झालली आहे. भुदरगड तालुक्यात बारा रुग्णांचे अहवाल सकारात्मक आहेत. हा तालुका रुग्णसंख्या बाबतीत अर्ध शतकाकडे वाटचाल करत आहेत. सध्या या तालुक्यात ४७ रुग्ण नोंदलेले आहेत. यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

सहा जणांची करोनावर मात

करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे काही दिलासादायक घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील सहा जणांनी करोनावर मात केल्याचे आज सांगण्यात आले. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील दोघे रुग्ण बरे झाले आहेत. त्यात माणगाव येथील वीस वर्षांचा तरुण आणि केर्ले येथील २३ वर्षांचा तरुण यांचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे येथील ३५ वर्षांचा तरुण तसेच पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील तीस वर्षांचा तरुण हे रुग्णही करोनामुक्त झाले आहेत. या चारही जणांवर यशस्वी उपचार करण्यात सीपीआर रुग्णालयाला यश आले आहे. या रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अठरा सकारात्मक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.