News Flash

पीपीई किटनिर्मितीला चालना; मात्र स्थानिक उद्योजक वंचित

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संचाची निर्मिती होण्यासाठी देशभर यंत्रणा सज्ज केली.

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : करोना महामारीच्या संकटात उद्योगांची वाताहत होत असताना वस्त्रोद्योगातील काही घटकांना तेजीचा बहर आला आहे. देशातील वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा धांडोळा घेतला असता पीपीई किट (व्यक्तिगत स्वसंरक्षण संच) या वस्त्र  प्रकाराने भारताने जगात उत्पादन निर्मितीत दुसरा क्रमांक राखल्याचे दिसून आले आहे. दररोज सुमारे पाच लाख संच निर्मिती करून सात हजार कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले असल्याचे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अहवालात नमूद केले आहे. ही प्रगती सुखावत असताना स्थानिक उत्पादकांना मात्र अडचणी निर्माण झाल्याचेही चित्र आहे.

करोना संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून बहुतेक सर्व उद्योग टाळेबंदीमुळे ठप्प झाले होते. याचा फटका वस्त्रोद्योगालाही बसला. तयार कपडे बनवणाऱ्या (गारमेंट) क्षेत्रातील काही उद्योजकांनी काळाची गरज ओळखून पीपीई संच व मुखपट्टी बनवण्यास प्राधान्य दिले.रुग्णांची वाढणारी संख्या, डॉक्टर परिचारिका यांच्या संरक्षणाची वस्त्रप्रावरणे याची गरज वाढून अचानकपणे या बाजारपेठेला तेजीचे दिवस आले.अल्पकाळात देशात ११०० उत्पादक बनले. उद्योजकांनीही टाळेबंदीचे आव्हान असतानाही ‘नॉन ओव्हन’ प्रकारचे कापड उपलब्ध करून नखशिखान्त शरीर झाकले जाणारे संच निर्माण करण्यास गती दिली. परिणामी गेल्या वर्षी जुलै महिन्यात असे संच निर्माण करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक बनला होता. वर्ष संपताना भारताला दुसऱ्या स्थानावर यावे लागले. ज्याचे उत्पादन बनवणे अगदी मर्यादित होते अशा ‘मेडी-टेक्स्टाइल’ क्षेत्रात भारताची प्रगती नजरेत भरणारी ठरली आहे. दररोज ५ लाख संचाची निर्मिती करून ७ हजार कोटी रुपयांचे उत्पादन मिळवले असल्याचे सरकारी आकडे सांगतात. पीपीई किट वापरणाऱ्यांचे प्रमाण इतके वाढले की, बडे लोक खरेदीसाठी जाताना त्याचा वापर करू लागले. याच्या वापराबद्दलचे खुमासदार किस्से चर्चेत आले.

शासन यंत्रणा सक्रिय

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संचाची निर्मिती होण्यासाठी देशभर यंत्रणा सज्ज केली. केंद्रीय नियंत्रण कक्ष सुरू करून टाळेबंदीत स्थानिक पातळ्यांवर उद्योगांना परवानगी देण्यात आल्या. सुमारे २०० नोडल अधिकारी देशभर मदतीसाठी नियुक्त करण्यात आले. रेल्वे, विमान व रस्ता वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली. दूरभाष संवाद आयोजित करून उद्योजकांना मार्गदर्शन करून अधिक निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या संचाची मागणी वाढत असताना गारमेंट उद्योजकांनी विदेशातून यंत्रसामग्री मागवली. उच्च दर्जाचे आवश्यक कापड खरेदी करून उत्तम दर्जाचे संच तयार केले. तथापि, आरोग्य विभागाने या खरेदीसाठी वैद्यकीय परवाना असलेल्या कंपन्यांनीच निविदा भरावी, अशी नियमावली लागू केली. या अडसरमुळे गारमेंट उद्योजकांना थेट निविदा भरण्यात अडचणी आल्या. वास्तविक वैद्यकीय नियमावलीला अनुसरून वस्त्रोद्योग कंपनीने संच बनवले असताना त्याला भलतेच कारण लागू करण्यावर वस्त्र परिधान निर्मिती उद्योजक नाराजी व्यक्त करीत आहेत. ‘सुरुवातीला सुमारे ७००  रुपयांना विकले जाणारे संच ३०० रुपये असे अगदीच स्वस्त विकल्याने गुणवत्ताही हरवली. प्रारंभी यामध्ये चांगला नफा मिळाला. नंतर पंधरा लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले, अशी खंत ‘युवा गारमेंट’चे युवराज घोरपडे यांनी व्यक्त केली. ‘महालक्ष्मी क्रिएशन’चे राजू बोंद्रे यांनी रुग्णसंख्येपाठोपाठ मागणी वाढल्याने गुणवत्तेपेक्षा वेळ मारून नेणारे संच वापरण्याकडे कल राहिला. मध्यंतरी करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने या बाजारपेठेला उतरती कळा लागली होती. पण दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाल्यावर पुन्हा तयार कपडे बनवण्याकडे गारमेंट उद्योजकांचा कल वाढला असल्याचे निरीक्षण नोंदवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:02 am

Web Title: india ranks second in the world in manufacturing of ppe kits
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
2 कोल्हापुरात मुसळधार पाऊस
3 १०५ वर्षांची वृद्धा करोनामुक्त
Just Now!
X