राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करताना महाराष्ट्र राज्यास सर्वोच्च प्राधान्य दिल्याने राज्यात जवळपास ७५ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ या उपक्रमात गेल्या वर्षभरात झाली आहे. यापुढील काळातही राज्यातील उद्योगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण केले जात असून, महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर ठेवण्याचा निर्धार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला.
ग्लोबल व्हिजन ग्रुपतर्फे येथील हॉटेल सयाजी येथे ‘मेक इन इंडिया’ या चर्चासत्राचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली असून, ‘मेक इन महाराष्ट्र’लाही गती दिली आहे. औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण करून उद्योजकांना आकर्षति करण्यासाठी पायाभूत सुविधा प्राधान्यक्रमाने देण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच उद्योगक्षेत्राला पूरक ठरतील, असे नवनवे प्रकल्प राज्यात घेतले जात आहेत. मुंबईत येत्या फेब्रुवारीमध्ये ‘मेक इन इंडिया विक’ हा मेगा इव्हेंट आयोजित केला जाणार असून, राज्याबरोबर देशविदेशातील उद्योजक सहभागी होणार आहेत. या मेघा इव्हेंटमध्ये राज्यातील विशेषत: कोल्हापुरातील उद्योजकांनीही सहभागी होऊन ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न साकार करण्यात सक्रिय व्हावे, असे आवाहनही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
औद्योगिक वीजदरासंदर्भातही येत्या १९ जानेवारीला वीजमंत्र्यांसमवेत उद्योजकांची विशेष बठक मुंबईत घेण्यात येऊन या संदर्भातील प्रश्न मार्गी लावले जातील. असे क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतले असून औद्योगिक वाढीचा वेग या पुढील काळात निश्चितच गतिमान राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी म्हणाले, उद्योगांसाठीच्या परवानगी कमी करण्याबरोबरच अनेक पायाभूत सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. अमरावती येथे मोठे वस्त्रोद्योग पार्क शासनाने मंजूर केला असून, कोल्हापुरातील वस्त्रोद्योग पार्कला निश्चितच गती दिली जाईल. या प्रसंगी सन फार्मास्युटिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत महाडिक, उद्योजक मोहन मुल्हेरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शीतल मिरजे यांनी प्रास्ताविक केले.