कोल्हापूर : संगीत क्षेत्राची पाच दशके निरंतर सेवा करणाऱ्या इचलकरंजी येथील ‘गायनाचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’ने कार्याचा पैस आणखी विस्तारण्याचे ठरवले आहे. कालानुरूप काही सुविधा निर्माण करण्याचा मंडळाचा मानस आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

संगीत विश्वाशी जोडलेल्यांना पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे नाव परिचित आहे. बुवांच्या स्मृती जागवण्यासाठी ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’ची स्थापना झाली. पुढे सत्तरच्या दशकात विख्यात लेखक, गुणग्राहक व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने मंडळाला संस्थात्मक रूप प्राप्त झाले. तेव्हापासून वस्त्रनगरीत सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. मागील पाच दशकांत देशभरातील बहुतेक विख्यात गायकांनी आपली कला संस्थेत सादर केली आहे. यामुळे इचलकरंजी परिसरात संगीताचे वातावरण चांगलेच रुजले. उद्यमनगरी असूनही इचलकरंजीसारख्या गावात गायन, वादन, नृत्य शिकणारी नवी पिढी तयार झाली. कलेतील या शिष्यांसाठी संस्थेतील कक्ष अपुरे पडू लागले. संस्थेच्या माध्यमातून कानसेनांचा नवा वर्ग तयार झाला आहे.

संस्थेचा वाढता व्याप आणि शहराची वाढती रसिकता लक्षात घेऊन संस्थेच्या वास्तुरचनेत बदल करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. अधिकाधिक रसिकांना सामावून घेणारे सभागृह, संगीत अध्ययनासाठी अधिक खोल्या, आधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, आसन व्यवस्था, विविध वाद्ये यांची संस्थेला गरज आहे. या गरजेनुसार मंडळाच्या संचालकांनी नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे.

संस्थेचा आजवरचा प्रवास कोणत्याही शासकीय मदतीशिवाय केवळ लोकाश्रयावर सुरू आहे. आर्थिक स्थिती बेताची असतानाही संचालक मंडळाने ही सांगीतिक परंपरा आजवर अथकपणे चालवली आहे. ही परंपरा पुढे अशीच जोमाने सुरू ठेवण्यासाठी समाजाने संस्थेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.