इचलकरंजी येथे झालेल्या अश्रुधूर नळकांडीच्या स्फोट प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिले. चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजी येथे शिवाजीनगर पोलिसांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिके केली होती. िलबू चौक येथे सराव सुरू असताना अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट झाला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले होते. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या बेफिकीर कामकाज पद्धतीविरोधात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकाराची सखोल चौकशी केली जावी अशी मागणीही होऊ लागली.
या प्रकाराची दखल पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी घेतली आहे. हा प्रकार गंभीर असल्याने त्याची चौकशी केली जाणार आहे. चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सराव करीत असताना अश्रुधुरासारख्या अस्त्रांचा शक्यतो वापर केला जात नाही. केवळ आवाज यावा यासाठी माफक स्वरूपाची यंत्रणा उभी करणे आवश्यक असते. तथापि, या प्रकारामध्ये हलगर्जीपणा झाला असल्याची शक्यता दिसत असल्याचे वर्तवून त्यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेतली जाईल असे सांगितले.
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. येथील स्थानिक इस्पितळात उपचारावर मर्यादा आल्याने त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमी िनबाळ यांचा कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला आहे.
पोलिसात नोंदच नाही
शहरात किरकोळ स्वरूपाची घटना घडल्याचे समजले तरी इचलकरंजीतील पोलीस स्वतहून तक्रार नोंदवून घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे येतात. पण अतिसंवेदनशील भागात  अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट होऊन २४ तासांचा कालावधी लोटला तरी याबाबत कसलाही गुन्हा पोलिसात दाखल न झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.