24 January 2021

News Flash

चित्रपट महामंडळात अंतर्गत वाद उफाळला; गुरुवारची सभा वादळी होण्याची चिन्हे

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चित्रपट महामंडळाची निवडणूक खांद्याला खांदा लावून लढवून समर्थपणे विजयी झालेले महामंडळातील संचालक आता एकमेकांना नामोहरम करण्याच्या इराद्याने आखाडय़ात उतरले आहेत. महामंडळाच्या गुरुवारच्या सभेत उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह दोन संचालकांच्या सदस्यत्वाला स्थगिती देण्याचा विषय गाजत आहे. तर महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या कार्यपद्धतीचा विषय प्रामुख्याने आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला आहे.

सन २०१६ मध्ये चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये ‘समर्थ आघाडी’ने १४ पैकी १२ जागा जिंकून झेंडा फडकविला. अध्यक्षपद मिळाल्यानंतर मेघराज राजेभोसले यांनी सर्वाना सोबत ठेवून महामंडळाचा कारभार नेकीने हाकण्याचा इरादा व्यक्त केला होता. गेल्या दीड वर्षांपासून संचालकांचा कारभार उत्तरोत्तर वादग्रस्त बनत चालला आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप, पोलिसात गुन्हे दाखल झाल्याने महामंडळाची प्रतिमा डागाळत चालली असून त्याचे भान उरले नाही.

करोना मदतीवरून वाद

करोनामुळे चित्रपट क्षेत्रातील तंत्रज्ञ, कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केल्यावर माधुरी दीक्षित, रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी मदत केल्याने मोठा निधी जमला. गरीब कलाकारांना मदत करण्यावरून संचालकांचे डावपेच राजकारण्यांना मागे टाकतील अशा पद्धतीने रंगत आहेत. ‘महामंडळाच्या सभासदांना मदत स्वरूपात गृहोपयोगी साहित्य, साखर, तेल अशा वस्तू राजेभोसले यांच्या मर्जीतील संचालकांनी लाटल्या. त्यांना जाब विचारण्याऐवजी अध्यक्षांनी माझ्यावर दोन लाख रुपयांचा धनादेश चोरल्याचा आरोप केला. ‘महाकला मंडळ’सारख्या नवख्या संस्थेत चित्रपट महामंडळ समाविष्ट करून त्यांनी ५४ वर्षांची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप उपाध्यक्ष धनाजी यमकर यांचा आहे. त्यांच्या भूमिकेला माजी उपाध्यक्ष विजय पाटकर, संचालक सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांनी पाठबळ दिले. कलाकारांसाठी रोख स्वरूपात मिळालेल्या मदतीतून जेवणावळी झाल्या, असा आरोप माजी कार्यवाह रणजित जाधव यांनी केला. यामुळे अध्यक्ष राजेभोसले यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागले. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. उलट साखर आणि धनादेश चोरीची प्रकरणे घडली नसतानाही उपाध्यक्ष यमकर आणि विरोधकांनी ती रंगवल्याने त्यांना साथ देणाऱ्या विरोधकांवर कारवाई केली जाणार आहे. रणजीत जाधव, विजय पाटकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्यासाठी हा प्रकार सुरू केला आहे. विधान परिषदेतून आमदार होण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नव्हता. राजेभोसले यांनी आपल्यावरील आरोपाचे खंडन केले. त्यांच्या या भूमिकेला संजय ठुबे, रवी गावडे, शरद चव्हाण, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर या संचालकांचे समर्थन आहे. हा वाद गाजत असताना आता आगामी सभेवरून वाक्युद्ध सुरू झाले आहे.

 संचालकपद स्थगितीचा प्रस्ताव

महामंडळातील संचालक मंडळातील बेबनाव आता टोकाला गेला आहे. दहा महिन्यांनंतर  कोल्हापुरात होणारी संचालक मंडळाची सभा म्हणजे राजकीय आखाडा बनणार असल्याचे विषयपत्रिका सांगते. २६ नोव्हेंबर रोजीच्या सभेत धनाजी यमकर यांचे उपाध्यक्षपद स्थगित करण्याचा व रणजीत तथा बाळा जाधव यांचे संचालकपद रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. यावरून वाद झडतो आहे. ‘संचालक पद स्थगित करण्यासाठी आधी वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मुळातच कार्यकारिणीला हा अधिकारच नाही. अध्यक्ष राजेभोसले यांच्या मनमानी कारभाराचा पंचनामा सभेतील पहिल्याच विषयावर केला जाणार असल्याने त्यांनी द्वेषबुद्धीने या विषयाचा घाट घातला असला तरी त्यांची कृत्ये बाहेर आणण्यासाठी अन्य संचालक सज्ज आहेत’,असे यमकर यांची भूमिका आहे. दरम्यान, ‘यमकर, जाधव यांच्याविरोधात जाणीवपूर्वक कारवाई केली जाणार नाही. त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची माफी मागितली की विषयावर पडदा पडू शकतो. बैठकीत आपली आणि इतरांची प्रतिष्ठा राखून वर्तन केले तर वैधानिक दर्जा राखला जाऊन व्यवस्थित चर्चा होईल. अरेरावीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही,’ असे मेघराज राजेभोसले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वार्षिक सभेत गोंधळ

गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळातील गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे सभेचे कामकाज गुंडाळावे लागले. महामंडळाचे कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार यांच्या अंगावर धावून जाण्याचा, कागदपत्रे भिरकावण्याचा प्रकार घडल्याने संतप्त झालेले सभाध्यक्ष राजेभोसले यांनी सभा स्थगित करत बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर सभासदांनी रोखून धरले. खोटा गुन्हा दाखल झालेल्या तीन सदस्यांचे सभासदत्व रद्द करावे या मागणीवरून गदारोळ झाला. ‘मंचाखाली जाऊन संचालकच चुकीचे बोलणार असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा’, अशी भूमिका राजेभोसले यांनी संचालक रणजित जाधव यांना उद्देशून घेतल्याने पुन्हा वाद भडकला व  अध्यक्षांना सभासदांनी धारेवर धरले. या वादग्रस्त सभेनंतरही संचालकातील बेबनाव या ना त्या कारणाने उफाळून येत राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 12:12 am

Web Title: internal dispute arose in the film corporation abn 97
Next Stories
1 हुतात्मा संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
2 उपक्रमशीलता आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव
3 शेतकरी नेत्यांमध्ये पुन्हा खडाजंगी
Just Now!
X