|| दयानंद लिपारे

मुश्रीफ व महाडिक यांच्यातील दुहीचा नवा अध्याय

राजकीय परिवर्तनाची दिशा बदलण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण दिवस घालवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वास पक्षांतर्गत बेदिलीचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले. कटुता कमी व्हावी असा प्रयत्न केला जात असताना जाणते-अजाणतेपणातून आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील दुहीची ठळक बाजू नव्याने दृष्टीस पडली.

उमेदवार निश्चित करून पुढचे पाऊल टाकले जात असताना पक्षातील बेबनावाचे दर्शन घडणे हे पुढचे सर्व काही सुरळीत होईल असे म्हणणे अडचणीचे ठरणार आहे. मित्रपक्षाचे आमदार सतेज पाटील यांच्याकडून अजूनही विरोधाची प्रबळ भाषा केली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ऐक्याची हाक देत निघालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी या मित्रपक्षांच्या वाटचालीचा कोल्हापुरातील मार्ग  अडथळ्यांचा बनत चालला आहे. वातावरणच अंदाज आल्याने खासदार महाडिक यांनीही ताकदीवर निवडून येण्याची तयारी चालवली आहे.

कोल्हापूरची राजकीय पाश्र्वभूमीच पुरोगामी धाटणीची. त्यामुळे येथूनच परिवर्तनाची हाक दिली की, त्याचे सुदूर परिणाम दिसतात, असा पुरोगामी पक्षांचा तर्क. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा कोल्हापुरात पोहचली तेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय महाडिक यांनी सत्ता परिवर्तनाचे आवाहन केले. पक्ष देईल त्या उमेदवारास निवडून आणले पाहिजे, असे आवाहनही केले. एव्हाना, कोल्हापुरातून विद्यमान खासदार महाडिक यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असे वातावरण जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये तयार झाले आहे. त्यामुळे थेट उमेदवारी कोणाला मिळावी या वादाचे पडसाद उमटले नाहीत. पण उमेदवारीस विरोध करणारी गटबाजी प्रकर्षांने दिसली.

राष्ट्रवादीतील विरोधाची बीजे

कागल तालुका हा राष्ट्रवादीच्या राजकारणचा केंद्रबिंदू. कोणता मुद्दा उचलून धरायचा आणि कोठे विरोधाची शस्त्रे परजायची याची खलबते येथून निश्चित केली जातात. कागल गडाचे सेनापती आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून होणाऱ्या वादातून माघार घेतली आहे. महाडिक यांची उमेदवारी त्यांनीही निश्चित मानली आहे. ‘पक्षाचा उमेदवार कोणीही असू दे, निवडून आणण्यास कटिबद्ध आहोत’ अशी निष्ठावंत बाण्याची भाषा त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहे. वरकरणी महाडिक यांच्यासाठी अवघा राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून एकवटला आहे असे चित्र दिसते आहे. मात्र, ते किती आभासी आहे याचे दाखले कागल आणि कोल्हापुरात एकाच दिवशी पाहायला मिळाले. कागल येथील सभेत खासदार महाडिक यांनी जाणीवपूर्वक आमदार मुश्रीफ यांचा नामोल्लेख टाळला, असा जोरदार आक्षेप घेत त्यांचे भाषण मुश्रीफ समर्थकांनी समस्त नेत्यांच्या साक्षीने बंद पाडले. प्रसंगावधान राहून मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दटावणी देऊन महाडिक यांना पुन्हा भाषण करण्यास सांगितले. तोवर सभेचा नूर पालटला होता. राष्ट्रवादीतील ऐक्याचे रस्त्यावर नेमके काय चालले आहे हे दाखवण्यासाठी या ‘रोड शो’पेक्षा अन्य चांगले उदाहरण नाही. कागल असो की, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांच्या राधानगरी- भुदरगड तालुक्यात मुधाळ येथील सभा. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर त्यांच्या तोंडी असणारी भाषा वेगळेच वास्तव अधोरेखित करते. ‘सभांचे नेटके आयोजन करू, मायंदाळ गर्दीही करू, पण मत कोणाला द्यायचे ते मात्र आमचे आम्ही ठरवू’ ही कार्यकर्त्यांकडून ऐकवली जाणारी विधाने पाहता राष्ट्रवादीत ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ होणार याची चाहूल लागते. ग्रामीण सभा संपल्यानंतर कोल्हापूर शहरात झालेली सभाही वेगळाच नूर धारण करणारी होती. जणू अवमानाचे उट्टे काढणारी. पक्षाच्या कार्यक्रमात महाडिक सहभागी नसतात असा त्यांच्यावर पक्षांतर्गत विरोधकांचा आणखी एक आक्षेप. त्यामुळे कोल्हापुरातील सभेच्या नियोजनाची सूत्रे आल्यानंतर महाडिक यांनी सभेचे जंगी नियोजन केले. पण, सभेवेळी केवळ महाडिक यांचाच जयघोष होत राहिला. ही घोषणाबाजी त्यांच्या विरोधकांचा चेहरा उतरवण्यास पुरेसा ठरला. जणू कागलची परतफेड कोल्हापुरात. दोन्ही सभास्थळी झाले ते जाणते की अजाणतेपणातून झाले याचा निष्कर्ष आता दोन्ही गटांची मंडळी आपापल्यापरीने करू लागली आहेत. पण, त्याचा लसावि मात्र धनंजय महाडिक – हसन मुश्रीफ यांच्यातील अद्यापही ठणकत असलेल्या वेदनादायी गटबाजीपर्यंत येऊन ठेपत आहे. जिल्हास्तरीय नेत्यांमधील हा वाद धुमसत असताना तिकडे जिल्हाध्यक्षाच्या तालुक्यातही सारे काही ठीक होते अशातला भाग नव्हता. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून त्यांना विधानसभा लढवायची आहे. पण अडचण सुरू होते ती चक्क घरातून. त्याचे मेहुणे के. पी. पाटील यांना पराभव पुसून पुन्हा विधानसभेत जुन्याचे वेध लागले आहेत. सर्व नेत्यांनी हात उंचावून सभेला अभिवादन केले तेव्हा मेहुणे – पाहुणे यांनी हातात हात देणे टाळले. गटबाजीचा का गावरान मामला पाहता राजकीय परिवर्तनाच्या मार्गात किती मोठी धोंड उभी आहे याची प्रचीती येत राहते.

प्रचार लोकसभेचा चाचपणी विधानसभेची

परिवर्तनयात्रेचा मुख्य रोख लोकसभा निवडणुकीचा राहिला. आधी देशातील सत्ता घालवू मग राज्यातील, असे आवाहन करण्यात आले. लोकसभेला प्राधान्यक्रम दिला जात असताना नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची चाचपणीही केली. कागल, मुधाळ, शिरोळ या प्रत्येक ठिकाणी मुश्रीफ, के. पी. पाटील आणि शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशेषत: के. पी. पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शक्तिप्रदर्शन घडवून आपल्या राजकीय सामर्थ्यांचे दर्शन नेतृत्वास घडवले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभेचा प्रचार करतानाच विधानसभेची चाचपणी केली.

अजित पवारांची सतेज पाटलांना टोचणी

धनंजय महाडिक यांच्या प्रचाराची एक फेरी परिवर्तनयात्रेच्या निमित्ताने पूर्ण झाली. ती होत असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाडिकविरोधाची धून पुन्हा एकदा आळवली. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याविषयी ते सातत्याने सहानुभूती व्यक्त करीत आहेत. उभय काँग्रेसच्या ऐक्याला हा गतिरोधक ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र हा सूर मानवणारा नव्हता. अजित पवार यांनी या प्रकारावर भाष्य करताना, ‘सतेज पाटील यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करावाच लागेल,’ असे निक्षून सांगितले. सतेज पाटील यांचे पिता डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश घडवून आधीच कोंडी केलेल्या राष्ट्रवादीने आणखी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याने आता आमदार पाटील कोणता पवित्रा घेणार हे लक्षवेधी ठरणार आहे.