स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद वाढीस

‘उदंड झाल्या यात्रा, परी बळीराजाच्या समस्यांवर निघेना मात्रा’ अशी काहीशी अवस्था शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या एकजात सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांची झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये विशेष स्थान असलेल्या आणि राज्यातील आघाडीची म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी दुसरी ‘आत्मक्लेश यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. बळीराजाचा रोजच बळी जात असताना आणि शेतीचे प्रश्न जटिल बनत चालले असताना अशा यात्रा समस्येचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त कितपत, असा प्रश्न आहे.

यानिमित्ताने स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी राजकीय पोळी भाजून घेत आहेत, की खरेच शेतकऱ्यांचे सारे प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, याचा फैसला शेतकरी वर्गाला अपेक्षित आहे. दुसरीकडे, शेतकरी प्रश्नांवर सार्वत्रिक एकीची अपेक्षा करणारे राजू शेट्टी आणि त्यांचे जिवाभावाचे मित्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात एकी कधी होणार, याची काळजी स्वाभिमानी संघटनेत बेबनाव नसावा असे वाटणाऱ्या गटाला लागून राहिली आहे.बळीराजाच्या कर्जमुक्तीची हाक देत शेट्टी-खोत या जोडगोळीने तुळजापुरात भवानी देवीला साकडे घालत नव्या आंदोलनाची गेल्या वर्षी मशाल पेटवली. दोघांनीही केंद्र व राज्य शासनाच्या कृषी धोरणावर टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली. या जोडीलाच स्वामिनाथन समिती अहवाल स्वीकारावा, उसाचा दुसरा हप्ता, शेतीपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या जाचातून मुक्तता करावी, या शेतकऱ्यांना सतावणाऱ्या मागण्या होत्याच. या दोघांनी अवघा महाराष्ट्र िपजून काढण्यास सुरुवात केली.

प्रवेश क्लेशापर्यंत

यथावकाश विधान परिषद आणि राज्यमंत्रिपद मिळाल्याने खोत यांना सत्तासंगतगुण लागला. त्यांची बुलंद तोफ थंडावली. उलट, तीमधून शासन शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवत आहे, या विचाराची ज्योत तेवू लागली. मंत्रिपदाचे स्थानमाहात्म्य ओळखून खोत यांनी टाकलेली पावले त्यांच्या कार्य, जबाबदारीच्या परिघात योग्य होती; पण ते संघटनेतील साऱ्यांनाच मान्य नसल्याने समाजमाध्यमांतून सदाभाऊंना लक्ष्य केले जाऊ लागले, तर परिस्थिती ओळखून शेट्टी यांनी कर्जमुक्ती अभियानाची धुरा एकटय़ाच्या खांद्यावर घेणे पसंत केले. या अभियानाचे एक पर्व कोल्हापुरातील शेतकरी मोर्चाने झाले. आता पुढचे पाऊल म्हणून २२ मेपासून पुणे ते राजभवन अशी क्लेशयात्रा निघणार आहे.

मत्रीचा उलटा प्रवाह

आत्मक्लेशयात्रा पूर्ण होईपर्यंत शेट्टी-खोत यांची मत्री आणखी गडद होणार की क्लेशाची तीव्रता वाढत राहणार हे महत्त्वाचे. कोल्हापुरातील मोर्चावेळी उभयतांचे वाग्बाण लक्ष्यभेद करणारे होते. शेट्टी यांनी ‘आगामी लढा हा कोणी सोबत येवो वा ना येवोत एकटय़ाने लढणार असल्याचे’ सांगत पुढेही भाऊशिवाय लढा कायम असल्याचे स्पष्ट केले, तर खोत यांनी ‘सनिक असल्याने रणांगणात तलवार घेऊन आयुष्यभर लढण्याची तयारी असलेला सच्चा कार्यकर्ता आहे,’ असे सांगत येईल त्या प्रसंगाला तोंड देण्यास आपण समर्थ असल्याचे रांगडय़ा भाषेत तमाम टीकाकारांना सुनावले. ‘कोणाच्या मेहेरबानीने मंत्री झालो नाही’ अशा शब्दांत सदाभाऊंनी शेट्टी यांना भर सभेत सुनावण्यास कमी केले नाही. त्याला प्रत्युत्तर देत शेट्टी यांनी ‘वातानुकूलित कक्षात बसून नव्हे तर रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे’ अशा शब्दांत संघटनेच्या अपेक्षा सदाभाऊंना जाहीरपणे ऐकवल्या. शेट्टी-खोत यांचा मत्रीच्या मळ्यातील पाण्याचा प्रवाह यापुढे कसा असणार हे या विधानांनीच स्वयंस्पष्ट केले आहे. आंदोलनाचे फलित काय याचा शोध घेण्याऐवजी शेट्टी-खोत ही जोडगोळी आपलीच बाजू कशी योग्य हे सांगण्यात गुरफटली आहे. याच वेळी दोघांनाही लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे. या नादात स्वाभिमानी शेतकरी चळवळीचे नुकसान होत आहे, याची काळजी उभयतांना असल्याचे जाणवत नाही.

लढावे तर लागेलच

सत्तांतर होऊनही शेतकऱ्याला कसलाही दिलासा स्वाभिमानीकडून मिळू शकला नाही. उलट त्याच्या समस्येचे स्वरूप जटिल होत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर खासदार शेट्टी यांनीही ही वस्तुस्थिती मान्य असल्याचे सांगितले. याच वेळी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून घरी बसून चालणार नाही. हतबल झालेला शेतकरी आत्महत्याकडे वळत असून हा शेतकरी चळवळीवर लागलेला डाग आहे, असेही शेट्टी यांनी प्रांजळपणे कबूल केले.

शेतकऱ्याला संरक्षण का देऊ शकत नाही, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. उद्दिष्ट साध्य होत नाही म्हणून वाघांची संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ढिलाई न ठेवता लढावेच लागणार असल्याचे शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

आंदोलनातून साध्य काय?

कर्जमुक्ती अभियानाच्या निमित्ताने शेट्टी यांनी राज्याबरोबरच देशही पालथा घेतला. मात्र त्यांनी हाती घेतलेल्या कर्जमुक्ती, उसाचा दुसरा हप्ता, शेतीपंपाला अखंड वीजपुरवठा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, या प्रश्नांपकी अद्याप ना कोणता प्रश्न सुटला ना शेतकऱ्याला भरीव दिलासा मिळाला. तूरडाळ, कापूस, धान खरेदी याविरुद्ध टोकाचा आवाज उठवूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने राज्यातील बळीराजाच्या आत्महत्येच्या प्रमाणाचा आलेख उंचावत आहे. केवळ शेतकरी प्रश्नाचे गांभीर्य, तीव्रता वाढवत ठेवण्यात शेट्टी यांना यश आले आहे इतकेच.

उदंड झाल्या यात्रा

शेतकरी प्रश्नाचा कळवळा आणून लढण्याची भाषा सत्तासंपादन करण्यास सोपी. साहजिकच, सत्ताधारी असो की विरोधक कर्जमाफीची धून वाजवताना आढळतो. त्यामुळेच सांप्रतकाळी महाराष्ट्र देशी शेतकरी प्रश्नांच्या यात्रांचा सुकाळ झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधकांनी ‘संघर्ष यात्रा’ काढून महाराष्ट्रात भटकंती चालवली आहे. शेट्टींनी कर्जमुक्ती अभियानाला आता आत्मक्लेश यात्रेची जोड दिली आहे. रघुनाथदादा पाटील व आमदार बच्चू कडू यांनी ‘आसूड यात्रा’ सुरू केली आहे. इतक्या यात्रा निघताहेत म्हटल्यावर सत्ताधारी भाजपला कसे राहावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बांधावर जाऊन ‘संवाद यात्रा’ काढून त्याद्वारे संघर्ष यात्रेला उत्तर देणार असल्याचे घोषित केले आहे. या यात्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार किती हा भाग अलाहिदा असला तरी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यात्रांतून आरोप-प्रत्यारोपाच्या वळीव सरी मात्र जोरात कोसळणार याची चुणूक एव्हाना दिसू लागली आहे.