शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची टीका

कोल्हापुरात भाजप प्रबळ असल्याचा दावा करणारे आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना माजी आमदार असलेल्या महादेवराव महाडिकांच्या दारात जाण्याची गरजच काय उरली आहे. भाजप पक्ष नेमके कोण चालवतो पाटील की महाडिक अशी खरमरीत टीका शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांवर केली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ६७ जागेसाठी शिवसेनेच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर येथे आले असता त्यांनी शिवसेनेची भूमिका सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक तीन जिल्हा प्रमुख व दोन आमदारांच्या उपस्थितीत स्पष्ट केली. ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने १२ तालुक्यांतील ६७ जागांसाठी एकूण ८२७ जण इच्छुक आहेत. मुंबईनंतर कोल्हापूर हाच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यत शिवसेनेचे सहा आमदार असून त्यांचे कामही चांगले चालू आहे.

राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी अन्याय होत असेल तर आंदोलन करतोच. शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहेच. भाजपबरोबर सन्मानपूर्वक चर्चा झाली तरच युती होईल, असे त्यांनी निक्षून सांगितले. स्थानिक पातळीवर आघाडी करताना काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष किंवा त्याचे चिन्ह असेल तेथे युती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांनी  सेनेला गृहीत धरू नये

भाजपने त्यांच्या वाटय़ाला आलेल्या ४४ जागांपकी काही जागा शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत विचारले असता दुधवडकर यांनी थेट जागावाटपातील मुंबई महापालिकेचा भाजपचा फॉम्र्युला सांगत भाजपची कोंडी केली. ते म्हणाले, मुंबईत आमदार जास्त असल्याने भाजप जादा जागा मागत असतील तर कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार अधिक आहेत, याचा विसर चंद्रकांत पाटील यांना कसा पडला आहे. आम्हाला मोजक्या जागा देणारे ते कोण.  सन्मान नसेल तर शिवसेना स्वबळावरही लढायला तयार आहे.  मंत्री पाटील यांना विकासापेक्षा पक्ष वाढविणे महत्त्वाचे वाटते. विकासाची भाषा करताना त्यांना जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.