टाळेबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये, अशा सूचना सातत्याने दिल्या जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चपराक देणारा एक बोलका उपक्रम कोल्हापूर पोलिसांनी सुरू केला आहे. अशा नटखट लोकांसाठी ‘बेजबाबदार नागरिक सेल्फी पॉइंट’ सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी या अंतर्गत १६ जणांची ‘सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक’ अंतर्गत छायाचित्र काढण्यात आली.

देशामध्ये कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून आज पंतप्रधानांनी त्याची मुदत आणखी वाढवली आहे. या काळात लोकांचा संपर्क होऊ नये, यासाठी त्यांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरीही काही लोक फुटकळ कारण पुढे करून रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना प्रसंगी पोलिसांकडून दंडुका दिला जात आहे. तरीही त्यातून त्यांना शहाणपण येताना दिसत नाही.

त्यामुळे ‘शहाण्याला शब्दाचा मार’ या म्हणीप्रमाणे कोल्हापूर पोलिसांनी ‘सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक’ असा वेगळा उपक्रम राबवला आहे. मास्क न लावता फिरणे, अकारण रस्त्यावर फिरणे, वाहन चालवणे, वाहनातून प्रवासी वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे रस्त्यावर आलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपाधीक्षक कार्यालयाच्यावतीने सेल्फी पॉइंट जवळ उभे केले जाते. तेथे ‘सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक’ असा फलक लावले असून तेथे पकडलेल्या लोकांचा सेल्फी काढला जातो. तसेच पोलीसही त्याला कॅमेराबद्ध करीत आहेत. अशा लोकांचे छायाचित्र समाज माध्यमात अग्रेषित केले जात आहे. ‘बोलक्या स्वरूपाच्या या उपक्रमातून लोकांमध्ये सुधारणा होतील आणि ते रस्त्यावर येण्यापासून परावृत्त होतील’, असे मत पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी मंगळवारी व्यक्त केले