जावेद अख्तर यांचा वारिस पठाण यांच्यावर हल्लाबोल

कोल्हापूर: जिनांच्या मानसिकतेचे लोक अजूनही भारतात आहेत. देशात १५ कोटी मुस्लिम एकतेने राहत असताना त्यांच्या नावाचा ठेका तुम्हाला कुणी दिला आहे,असा परखड सवाल ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना येथे गुरुवारी केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे सायंकाळी व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यावेळी जावेद अख्तर आणि गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांचे ‘ भारत: नव्या स्वातंत्र्यलढ्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यान झाले. वारिस पठाण यांनी आज ‘देशातील १५ कोटी मुस्लिम हे ११५ कोटी हिंदूंना पुरून उरतील’ अशी चिथावणीखोर भाषा केली होती. वारीस यांच्या या मतावर जावेद अख्तर यांनी चांगलेच ओरखडे ओढले.

ते म्हणाले, या देशात ब्रिटिशांनी १५० वर्ष सत्ता केली.पण देशातील ऐक्याला त्यामुळे फरक पडला नाही. मुस्लीम बांधव देशात एकतेच्या भावनेने सामावले गेले आहेत. असे असताना या १५ कोटी मुस्लिमांचा ठेका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?असा जाब जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. तसेच, तुम्ही पंधरा कोटीच रहाल, कधी सोळा कोटी होणार नाही, असे म्हणत अख्तर यांनी वारिस पठाण हे वेडे आहेत. आजही जिनांच्या विचारसरणीत ते वावरत आहेत, असा टोल लगावला.

अख्तर यांनी आपल्या भाषणात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले,  भाजप हा जगातला वेगळाच पक्ष आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग आहे. आज देशभक्तीचे प्रमाणपत्र देत  जे फिरत आहेत; त्याच लोकांनी ब्रिटिशांविरोधात एक तरी आंदोलन केले होते का?राष्ट्रीय संघ आणि मुस्लीम लीगचा एक तरी कार्यकर्ता स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेला होता का? अशी विचारणा करत त्यांच्या राष्ट्रभक्तीवर अख्तर यांनी प्रश्नचिन्ह लावले.

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

मुंबई : एमआयएमचे माजी आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून त्यांना धडा शिकविण्याचा इशारा भाजपने दिला आहे. जे पठाण पाच लाखाहून कमी मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, त्यांनी स्वतला १५ कोटी नागरिकांचे प्रतिनिधी समजून बोलण्याची गरज नाही, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात  आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.