वरिष्ठ पातळीवरून दुकाने सुरू करण्यासंदर्भात जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत सराफी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या बठकीत शनिवारी घेण्यात आला. संघाच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, कारागीर धास्तावले आहेत. तर, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची लग्नसराईत भलतीच कोंडी झाली असून त्यांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अबकारी कराला विरोध करण्यासाठी गेल्या १८ दिवसांपासून सराफ व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. या दरम्यानच्या काळात विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. याच्यापुढे आंदोलनाची काय दिशा असेल, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सराफ व्यावसायिकांच्या व्यापक बठकीचे आयोजन केले होते. याचबरोबर या बठकीत अबकारी करासंदर्भात चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल आणि दीपेश गुंदेशा यांनी मार्गदर्शन केले. याच बठकीत दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुंदेशा यांनी सांगितले, की अबकारी कर हा मुख्यत उत्पादनावर लागणार कर आहे. या कराबरोबर येणाऱ्या काळाला तोंड देण्यासाठी आपल्यात बदल करा. चेतन ओसवाल म्हणाले, एक टक्का सराफी व्यवसायाला अबकारी कर लागू झाला पण याच्याबाबत गरसमज अधिक आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी उद्या केंद्रीय स्तरावर जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनबरोबर इतर संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर याच्याशी संबंधित घटकांशी भेट घेत आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू.
मेळाव्याला सराफ व्यावसायिकांबरोबर झारी संघटना, चांदी संघटना, चांदी मूíतकाम संघटना, बंगाली कारागीर, पॉलिश संघटना, आटणी पास्टा संघटना, पटवेगारी, लाखवाले, पॉलिशवाले या संघटनाचे सदस्य उपस्थित होते. जवाहर गांधी यांनीही मार्गदर्शन केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. माणिक जैन यांनी आभार मानले.