16 December 2019

News Flash

कोल्हापुरातील मटण दरवाढविरोधी आंदोलन सरकार दरबारी

कोल्हापूर आणि आंदोलन याचे अतूट समीकरण आहे. येथे नित्यनियमाने कोणती ना कोणती आंदोलनाची ठिणगी उडतच असते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून संयुक्त समिती

कोल्हापूरकरांचा बाजच न्यारा. कधी कोणत्या प्रश्नावर आंदोलन करतील याचा नेम नाही.  मटण दरात वाढ झाल्याचे कोल्हापूरकरांनी आंदोलनाचा झेंडा हाती घेतला. ४५० रुपये किलोच्या घरात असणारा हा दर ६०० रुपये झाल्याने जिल्हातील नागरिक भडकले.

आंदोलनाने शहरातील पेठापेठांमध्ये तालमीतल्या पोरांनी दंड थोपडले, लोकही त्यांच्या मागे नारे देत जमले. काही मंडळांनी ४५० रुपये किलोप्रमाणे मटण विक्री सुरु करून महाग दराने विक्री करणारया विक्रेत्यांना धडा शिकवला.  त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा होऊ लागल्याने मटण विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागली. अखेर मटण दरासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यांनी अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना द्यावा लागला.

कोल्हापूर आणि आंदोलन याचे अतूट समीकरण आहे. येथे नित्यनियमाने कोणती ना कोणती आंदोलनाची ठिणगी उडतच असते. चार वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरातही टोलविरोधात हिंसक आंदोलनांची लाट उसळली होती. यातून  वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढणारे कार्यकत्रे आणि संघटनांना बळ  देणारे ठरले.

कसबा बावडा या उपनगरात या मुद्दावरून पहिली ठिणगी पडली. पंचगंगा नदीपलीकडे ४५० रुपये किलो दराने मटण विक्री सुरु असल्याचे सांगत बावडेकरांनी गावातील मटण विक्रेत्यांना त्याच दरात मटण विक्री करा, अन्यथा पर्यायी मटण विक्रेत्यांना पाचारण करून तुमच्यावर बहिष्कार टाकू’ असा इशारा दिला. पाठोपाठ कोल्हापूर शहराच्या भागाभागात तापत चालले. ग्रामीण भागात आंदोलनचे लोण पोहोचले. अनेक गावात मटण विक्री रोखण्यात आली.

संयुक्त समितीचा उतारा

२८० रुपये किलो दराने मिश्र मटण (चरबीसह) व विनामिश्र मटन ४५० रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी कृती समितीने केली. तर, मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो ५६० रुपयांऐवजी ५४० रुपयाने विक्री करू, अशी तयारी दर्शवली. आता याप्रश्नी बारा सदस्यीय समिती स्थापन झाली आहे. समितीत नागरी कृती समिती आणि मटण विक्रेते संघटनेचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, अन्न, औषध प्रश्न अधिकारी समिती नेमली आहे. समितीची निर्णय कुणाच्या पचनी पडणार हा प्रश्न आहे.

मटण विक्रेते मात्र बकरी महाग झाल्याने मटण सुद्धा जादा दराने विकणे भाग असल्याचे सांगत आहेत  दुष्काळ आणि त्यानंतरचा महापूर, परतीचा पाऊस यामुळे बकऱ्यांची पदास घटल्याने बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत बकऱ्यांचा पुरवठा कमी पडू लागल्याने मटणाच्या दरात वाढ होत आहे. गोवा, आंध्र प्रदेश , केरळ राज्यात ६५० ते ७०० रुपये किलो प्रमाणे मटण विक्री होत आहे. बकरे, बोकड याच्या चामडय़ाचे कारखाने बंद झाले झाल्याने भाववाढीला आणखी एक कारण आहे. कारण पूर्वी चामडय़ाला ३०० रुपये मिळायचे. आता दहा/वीस रुपयेमिळण्याची मारामार झाल्याचे विक्रेते सांगतात. त्यांचा हा मुद्दा अनेकांना मान्य नाही. त्यातून शिवसेना रस्त्यावर उतरली. तर नागरी कृती समितीने आवाज उठवायला सुरुवात केली आहे. नागरिक आणि विक्रेते यांच्यात संघर्ष सुरु झाला. लगोलग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही संयुक्त बठकीचे आयोजन केले.

First Published on December 4, 2019 1:19 am

Web Title: joint committee on collectors matan rate akp 94
Just Now!
X