नटश्रेष्ठ जयशंकर दानवे ‘कलायात्री’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना जाहीर झाला आहे.
मूकपटापासून बोलपटापर्यंत पाच तपाहून अधिक काळ मराठी चित्रपटांचा रुपेरी पडदा व रंगभूमी गाजविणारे अभिनेते व दिग्दर्शक जयशंकर दानवे यांचे स्मरण व्हावे म्हणून दानवे परिवारातर्फे गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी उपक्रम आयोजित केले जातात. २०११ सालापासून पुरस्कार सुरू झाले असून, हा पुरस्कार सिनेमा, नाटक आणि दूरचित्रवाणी या माध्यमावर पकड असणा-या रंगकर्मीला देण्यात येतो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाचा कलायात्री पुरस्कार बालगंधर्व, टिळक, ते कटय़ारपर्यंतचा अभिनय व दिग्दर्शनाचा प्रवास यशस्वीरीत्या करणारे सुबोध भावे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा दानवे यांच्या जयंतिदिनी १ मार्च रोजी अस्टर आधार हॉस्पिटलचे संस्थापक सदस्य डॉ. अजित कुलकर्णी यांच्या  हस्ते होत आहे. यानंतर सुबोध भावेंची रंगतदार प्रकट मुलाखत होईल. मुलाखत घेतील प्रा. डॉ. सुजय पाटील, अशी माहिती संयोजक राजदर्शन दानवे व सुधीर पेटकर यांनी दिली. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे यांना कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.