शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा पहिला राष्ट्रीय ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ भारतरत्न प्रा. सी. एन. आर. राव यांना जाहीर करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दीड हजारांहून अधिक शोधनिबंध व पन्नासच्या आसपास पुस्तके नावावर असलेले ते देशातील एकमेव संशोधक आहेत. १ लाख ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठास २५ लाख रुपयांच्या ठेवीतून हा पुरस्कार देण्यात येत आहे. ला. स्व. कणबरकर यांच्या पत्नी शालिनी कणबरकर यांनी सदर ठेवीसाठीचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ या शिवाजी विद्यापीठासह संयुक्त पुरस्काराची निर्मिती या निधीतून करण्यात आली. अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे, असेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
रसायनशास्त्रातील ‘विज्ञानयोगी’ असे वर्णन करण्यात येत असलेल्या प्रा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संशोधनासाठी ते अमेरिकेस रवाना झाले. पडर्य़ू विद्यापीठातून मध्ये त्यांनी पीएच.डी. संपादन केली. परदेशी संस्थेत काम करण्याची संधी चालून आलेली असूनही त्यांनी आयआयटी (कानपूर)च्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. देश व परदेशात विद्यार्थी घडविण्याचे काम केल्यानंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत त्यांनी सॉलिड स्टेट अँड स्ट्रक्चनरल केमिस्ट्री विषयातील संशोधन प्रयोगशाळेची स्थापना केली.  सी.एन.आर. राव हे ‘सॉलिड स्टेट’ आणि ‘मटेरिअल्स केमिस्ट्री’मधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील एक अधिकारी संशोधक म्हणून ओळखले जातात. सी. व्ही. रामन आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते देशातले तिसरे शास्त्रज्ञ आहेत. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.