18 January 2019

News Flash

कर्नाटकच्या मतदानाची कोल्हापुरात धांदल

प्रसंगी मतदारांचे चोचले पुरवले जात होते. 

आधी लगीन मतदानाचं- शुभमंगलची घटिका जवळ आली पण नवरा-नवरी दिसेनात. शोधाशोध केल्यावर कळलं की जोडपे मतदान करण्यासाठी रवाना झाले आहे. बेळगावातील कसाई गल्ली येथील मानिनी ताशीलदार हिचा विवाह कोरे गल्लीतील यश हंडे यांच्याशी होता.  या दोन्ही वधूवरांनी सकाळी विवाहकार्यात  सामील होण्याआधी मतदान करत राष्ट्रीय कार्याला प्राधान्य दिले. समाज माध्यमात याचे मोठे कौतुक करण्यात आले.

|| दयानंद लिपारे

निवडणूक कर्नाटक विधानसभेची असली तरी मतदानाची घाईगडबड  कोल्हापूरसह सीमावर्ती भागात शनिवारी दिवसभर सुरू होती  कोल्हापूरसह जिल्ह्यच्या विविध ठिकाणी असलेल्या मूळच्या कर्नाटकातील मतदारांना मतदानासाठी नेण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती. काँग्रेस, भाजप, निजद या तिन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते त्यासाठी राबत होते. प्रसंगी मतदारांचे चोचले पुरवले जात होते.  कर्नाटकला लागूनच कोल्हापूर जिल्हा आहे. तेथील अनेक लोक येथे नोकरी, व्यवसाय, उद्योग यानिमित्ताने जिल्ह्यत राहात आहेत. मात्र यापैकी अनेकांनी मतदान नोंदणी मूळ गावी म्हणजे कर्नाटकात केली आहे. अशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रमुख पक्षांनी कर्नाटकातील प्रचाराची जबाबदारी स्थानिक नेत्यांकडे सोपवली होती.  प्रचारातून उसंत मिळल्यानंतर याच नेत्याकडे मतदारराजाला मतदानासाठी आणण्याची जबाबदारीही सोपवली होती. त्यासाठी काल रात्रीच अनेक गावांत मोठय़ा प्रमाणात वाहने दाखल झाली होती. सकाळपासून मतदारांना एकत्रित करून त्यांच्या गावाला पोहोचवण्याची, मतदान करून घेण्याची, मतदानानंतर त्यांच्या मिष्टान्न भोजनाची आणि छानशी भेटवस्तू देऊन पुन्हा घरपोच करण्याची जबाबदारी आज अनेक कार्यकर्ते पार पाडत होते.

कोल्हापूर जिल्ह्यत कर्नाटकातील वेगवेगळय़ा क्षेत्रांत काम करणारे कामगार प्रचंड प्रमाणात आहेत. १५ हजारांपेक्षा अधिक कामगार कोल्हापूर शहरात, तितकेच कामगार-धारक यंत्रमाग क्षेत्रात, खेडय़ांमध्ये  शेतात काम करण्यासाठी असणारे मुक्कामी कामगार काही हजारात आहेत. या कामगारांचे या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मोठी यंत्रणा सूत्रबद्धपणे कार्यरत राहिली. त्यासाठी उमेदवारांना हजारोचा चुराडा करावा लागला. मतदानानंतर श्रमपरिहारासाठी कर्नाटकाला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील धाबे, हॉटेलमध्ये तोबा गर्दी उसळली होती.

निकालांवर मोठय़ा पैजा

कर्नाटकातील निवडणुकीत बाजी कोण मारणार यावरून कोल्हापूर जिल्ह्यत लाखोंच्या पैजा लागल्या आहेत. त्यातील ईष्र्या इतकी की काहींनी या बाबतचे करार करून त्याच्या प्रती समाज माध्यमात प्रसिद्ध केल्या असून त्यावरून चर्चेचा फड  रंगला आहे. माणगाव (ता . हातकणंगले) येथील राजू मगदूम व  नेमिनाथ मगदूम या दोघांनी चक्क ५१ हजारांची पैज लावली आहे. काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले तर नेमिनाथ यांनी राजू यांना रक्कम द्यायची आणि भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले तर राजू यांनी नेमिनाथना ही रक्कम द्यायची. विशेष म्हणजे कोणीही पैज जिंकली तरी पैजेची रक्कम गावातील वैष्णवदेवी मंदिर नूतनीकरणासाठी वापरायची आहे.  ही पैज ७  साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी स्वरूपात लिहून घेतली आहे.

First Published on May 14, 2018 1:10 am

Web Title: karnataka legislative assembly election 2018 8