कोल्हापूर: बेळगाव येथे होणाऱ्या हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी निघालेले राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रविवारी कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर अडवून त्यांचा प्रवेश नाकारला.  त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परतवून लावण्यात आले.

दरवर्षी बेळगावसह सीमाभागात १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळला  जातो. मंत्री यड्रावकर हे कोल्हापूरकडून बेळगावकडे एकीकरण समिती आयोजित कार्यक्रमासाठी  जात होते. या वेळी कर्नाटकचे पोलिस निरीक्षक संतोष सत्य नाईक,अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा कर्नाटकातील कोगनोळी गावातील टोल नाक्यावर अडवला. पोलिसांचा आवाज वाढल्याने यड्रावकर यांनी त्यांना मंत्र्यांशी नीट संवाद साधण्याबाबत सुनावले. त्यावर पोलीस नरमले . चर्चेनंतर मंत्री यड्रावकर यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवून देण्यात आले. गतवर्षी यड्रावकर यांनी राज्य परिवहन मंडळाच्या लालपरीतून प्रवास करून बेळगाव गाठले होते.तेथे त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केल्याची आठवण झाली. दरम्यान, यड्रावकर यांनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  सीमाभागाची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास वाटतो. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे ठणकावले.

दरम्यान, बेळगावात आज सीमालढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात दाखल असताना शहा यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट धुडकावल्याने मराठी भाषकांमधून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. शहा यांच्या दौऱ्यामुळे मराठी भाषकांना पर्यायी मार्गाने मिरवणूक काढावी लागली.