गांधीनगर येथे मॉìनग वॉकसाठी गेलेल्या श्यामलाल कन्हैयालाल निरंकारी या व्यापाऱ्याच्या १ कोटीच्या खंडणीसाठी केलेल्या अपहरणप्रकरणी गुरुवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तिघा आरोपींना अटक केली. प्रदीप शंकर सुतार (रा. गोकुळ शिरगांव), विकास वामन भोसले (मूळ रा. पुसेगांव, सध्या गोकुळ शिरगांव) व पवन कृष्णा पाटील (मूळ रा. भामटे, सध्या सरनोबतवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
७ जानेवारी रोजी निरंकारी हे मॉìनग वॉकसाठी गेले होते. त्यांच्या नातेवाइकांना फोन करून सुटकेसाठी १ कोटीची खंडणी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपास करीत असताना उपरोक्त तिघा आरोपींची नावे पुढे आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना तिघे आरोपी पवन पाटील याच्या घरी लपले असल्याची माहिती मिळाली. पाटील याच्या सरनोबतवाडी येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला असता तिघेही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी विजय ऊर्फ काळबा गायकवाड (रा. टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.