12 December 2019

News Flash

कोल्हापूर महापौर निवडीत  राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आघाडी!

काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता कायम टिकवली असली तरी नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना हात दिला.

संग्रहित छायाचित्र

अवघड वाटणारा पेपर अगदीच सोपा जावा तशी अवस्था मंगळवारी कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादात महापौरपदाची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अवघड जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण, शेवटच्या टप्प्यात ती अलगद बनली आणि राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर या महापौरपदी विराजमान झाल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता कायम टिकवली असली तरी नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना हात दिला. विरोधी भाजप- ताराराणी आघाडीला शिवसेनेची साथ याही वेळी मिळू शकली नाही. कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे त्रराशिक याहीवेळी कायम राहिले.

गेल्या डिसेंबरमध्ये महापौर पदासाठी आघाडीच्या सरिता मोरे विरुद्ध जयश्री जाधव यांच्यात लढत झाली. तेव्हा पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश येण्याची शक्यता निर्माण झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती. त्यामध्ये ४ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आणि एक भाजपचा होता. महापौर निवडीवेळी घडणारे हे रामायण याहीवेळी कायम होते. यंदा तर त्याला लोकसभा निवडणुकीतील वादाची फोडणी कारणीभूत होती. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार केला होता. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत लाटकर यांनी उघडपणे महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यातून महाडिक यांनी पक्ष सोडण्यापूर्वी सूरमंजिरी लाटकर यांना महापौर पदाची उमेदवारी देऊ नये, अशी तक्रार केल्याने लाटकर यांची उमेदवारी गेल्या वेळी गोत्यात आली होती. लाटकरांना डावलावे लागल्याने मुश्रीफ नक्कीच नाराज झाले. कारण सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शब्द दिलेल्यांनाच थांब म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. या वेळी लाटकर यांना सर्वानुमते पाठिंबा मिळाला. मात्र महाडिक यांच्यापासून होणारी चाल धोक्याची घंटा होती. तथापि, राज्यातील सत्तास्थापनेत चंद्रकांत पाटील हे गुंतल्याने त्यांनी घोडेबाजार न करण्याची भूमिका घेतली. पाठोपाठ महाडिक यांनीही आक्रमक राजनीती करण्याचे टाळले. परिणामी ज्या लाटकर यांना महापौर निवड अगदीच अवघड वाटत होती त्यांना ती सहजसोपी बनली. शिवसेनेने नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहात उभय काँग्रेसला पडद्यामागून मदत केली. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या सत्तास्थापनेचा प्रयोग यानिमित्ताने पुन्हा एकदा कलानगरी कोल्हापुरात ‘यशस्वीपणे’ पार पडला.

First Published on November 20, 2019 1:13 am

Web Title: kolapur mayor ncp congress shivsena akp 94
Just Now!
X