महाविकास आघाडीचा झेंडा; बजरंग पाटील अध्यक्ष, सतीश पाटील उपाध्यक्ष

कोल्हापूर : राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलांचे परिणाम थेट कोल्हापुरात दिसून आले आहेत. याचा पहिला धक्का कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपाला बसला आहे. गेली अडीच वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेत असलेल्या भाजपाच्या सत्तेला धक्का देत गुरुवारी महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड  झाली. दोघांनाही अनुक्रमे ४१, तर विरोधकांना २४ मते मिळाली. या निवडीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील हा पराभव माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना धक्का देणारा असल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून बजरंग पाटील आणि भाजप ताराराणी आघाडीकडून अरुण इंगवले, उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील आणि भाजप ताराराणी आघाडीकडून राहुल आवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ६७ सदस्यांपैकी ६५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे विजय भोजें तटस्थ राहिले, तर राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील गैरहजर राहिले. सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये पाटील यांना ४१ मते मिळाली, तर इंगवले यांना २४ मते मिळाली. पाटील यांनी १७ मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदाच्या निवडीत याचीच पुनरावृत्ती होऊ न आघाडीच्या पाटील यांना ४१ मते मिळाली तर विरोधी आवाडे यांना २४ मते मिळाली.

महाविकास आघाडीला श्रेय- बजरंग पाटील

या निवडीनंतर नूतन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदार, आमदारांनी आपल्याला सहकार्य केल्यामुळे आणि आमदार सतेज पाटील यांनी चाळीस वर्षांंच्या पक्षनिष्ठेला संधी दिल्यामुळे अध्यक्षपदावर विराजमान झालो असल्याची प्रतिक्रिया दिली. सतीश पाटील यांनी जिल्ह्यतील सामान्यातील सामान्याला न्याय देण्याची भूमिका घेऊ न काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यतील महाविकास आघाडीच्या आमदार, खासदारांचे आभार मानले.

अतिआत्मविश्वास नडला- ऋतुराज पाटील

आमदार ऋतुराज पाटील यांनी, महाविकास आघाडीतील समन्वयामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आली. महाविकास आघाडीच्या राज्यातील यशानंतर आता जिल्ह्यत यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास नडला असल्याची टीका पाटील यांनी केली.

महादेवराव महाडिकांना धक्का 

या निवडीमुळे राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला असून या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. तर, जिल्हा परिषदेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता संपुष्टात आल्यामुळे महाडिकांची जिल्हा परिषदेच्या राजकारणातून ‘एक्झिट’ झाली.