21 October 2018

News Flash

कोल्हापूर विमानसेवा पुन्हा लांबणीवर

कोल्हापूरची विमानसेवा सलगपणे कधीच सुरू राहिली नाही.

आता २२ किंवा २३ डिसेंबरला विमान झेपावण्याची शक्यता

कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याबाबत मंगळवारी आणखी एक वायदा ऐकायला मिळाला. १५ डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण आता ते किमान एक आठवडा पुढे गेले आहे. २२ वा २३ डिसेंबरला करवीरनगरीतून विमान हवेत झेपावण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी या मार्गातील सर्व अडथळे पूर्ण होण्याची गरज आहे. अन्यथा, हे आणखी एक हवेतील स्वप्न ठरण्याची शक्यता आहे.

राज्यातील औद्योगिक, सहकार, कृषी, चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील अग्रस्थानी असलेले शहर म्हणून ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरचा सर्वागीण विकास छत्रपती राजाराम महाराज यांनी केला. राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरात रेल्वे आणली, तर त्यापुढे जाऊन राजाराम महाराजांनी कोल्हापुरात विमानसेवा सुरू केली. त्यासाठी त्यांनी १७० एकर जमीन दिली.

४ मे १९४० रोजी कोल्हापूरच्या विमानतळाचे उद्घाटन राजाराम महाराजांच्या हस्ते झाले. त्यानंतर कोल्हापूरची विमानसेवा सलगपणे कधीच सुरू राहिली नाही. अनेक अडचणी येत राहिल्याने इथली विमानसेवा सातत्याने हेलकावे खात राहिली. पाच वर्षांपूर्वी बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहेत, पण त्याला अद्याप यश आले नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनी आपल्या परीने दिल्लीत ताकद लावली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी २७४ कोटी रुपये खर्चाच्या विमानतळ विकास आराखडय़ाला मंजुरी दिली. मात्र, महाराष्ट्र शासनाने ८० कोटी रुपये खर्च करावेत, अशी अट घातली होती. त्यावर, विमानतळाच्या विकास आराखडय़ासाठी राज्य सरकार २० टक्के हिस्सा म्हणून ५५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत केली होती. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जानेवारीला विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली होती, पण तीही हवेत विरली .

अडचण वेळेची

कोल्हापुरात विमानसेवा सुरू होण्यात ज्या प्रमुख अडचणी आहेत, त्यात अग्रक्रम आहे तो वेळेचा. विमान कंपन्या देतात ती वेळ स्थानिकांना गरसोयीची आहे. स्थानिकातही काहींना सकाळी मुंबईला पोहचून संध्याकाळी परतायचे आहे, तर काहींना विदेशात जाण्यासाठी रात्री मुंबईला जाणे सोयीचे आहे, पण रात्रीचे उड्डाण करण्याची सुविधा नसल्याने या पातळीवर घोडे पेंड खाते. त्यामुळे खरेच वर्ष अखेपर्यंत विमानसेवा सुरू होण्याबाबत साशंकता आहे.

नवा वायदा हवाई सेवेचा

कोल्हापूर विमानतळासाठी रखडलेले भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावण्याबरोबरच ‘डेक्कन एअरवेज’ ही विमानसेवा लवकर सुरू करण्याचे आश्वासन नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिल्यावर अलीकडेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा सत्कार केला होता. मात्र, ‘डेक्कन एअरवेज’ ही विमानसेवा आपल्याकडे उपलब्धच नसल्याची बाब मंत्री पाटील व खासदार महाडिक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पुन्हा संभाजीराजे यांनी हवाई वाहतूकमंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या काही दिवसात ‘डेक्कन एअरवेज’ विमान ताफा सेवेत रुजू होणार असून याद्वारे २२ वा २३ डिसेंबरला कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. याचे सूतोवाच मंगळवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले असल्याने विमान हवेत नव्हे तर खरेच उड्डाण करण्याची शक्यता बळावली आहे.

First Published on December 13, 2017 2:11 am

Web Title: kolhapur aircraft service stuck