कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचा दौरा

मुख्यमंत्र्यांची थेट भेट मिळत नसल्याने कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. ही मात्रा लागू पडली आणि मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांत याप्रश्नी बठक बोलावण्याचा शब्द दिला.

कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, अशी सहा जिल्ह्यांतील जनता, पक्षकार, वकील व लोकप्रतिनिधींची कित्येक वर्षांची मागणी आहे. याबाबत खंडपीठ कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. याबाबत निर्णय न झाल्याने खंडपीठ कृती समितीने सहा जिल्ह्यांत लाक्षणिक उपोषण करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात शिवसेनेचे  आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले होते.

या पाश्र्वभूमीवर आज क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी खंडपीठ कृती समितीने मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी श्ष्टिमंडळाच्या वतीने ठाकरे यांना, खंडपीठ आंदोलनाची माहिती देऊन न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अहवालाच्या पाश्र्वभूमीवर मंत्रीमंडळाने फक्त कोल्हापूर मध्येच खंडपीठ होण्याचा ठराव करावा, तसेच अंदाजपत्रकामध्ये खंडपीठ इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

त्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला. मंत्री एकनाथ िशदे यांच्यासमवेत खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट घ्यावी, या कामी खूप वेळ गेला आहे, असे सांगितले. यावर फडणवीस यांनी सत्वर या प्रश्नी बठक बोलावण्याचा शब्द दिला.

ठाकरे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना खंडपीठ हा प्रश्न समाजाचा आहे स्वस्थ बसु नका, असा सल्ला दिला. उच्च न्यायालयाने दहीहंडीबाबत निर्णय घेण्याऐवजी हा प्रश्र निकाली केला असता तर बरे झाले असते, अशी टिपणीही त्यांनी केली. खंडपीठ स्थापण्याची मागणी प्रलंबित राहिली, तर काय करावयाचे असा प्रश्रही ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मंत्री िशदे यांना मुख्यमंत्री यांची भेट होणेबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.  या वेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, माजी उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, अभिजित कापसे, रणजित गावडे, आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव हे उपस्थित होते.