कोल्हापूर : लोकसभेची उपांत्यफेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला ‘हात’ दिल्याने मरगळलेल्या काँग्रेस पक्षामध्ये मंगळवारी चैतन्य दिसून आले. या यशाबद्दल कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून जल्लोष केला.

पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकालाकडे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते लक्ष ठेवून होते. छत्तीसगड, राजस्थानात ,मध्यप्रदेशात येथे काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक उंचावल्याने कोल्हापूर शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालय आणि दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी फटाके वाजवून आणि साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीचे उपसभापती संदीप पाटील, पंचामत समिती सदस्य सुनील पवार, बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्रीपती पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी सदस्य बाबासाहेब चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

सायंकाळी, शहर काँग्रेस भवनात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.  शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गोकुळ संचालक अरुण डोंगळ, सुशील पाटील कौलवकर, संध्या घोटणे, मंगल खुडे, दीपाताई पाटील, किशोर खानविलकर, एस. के. माळी, विक्रम जरग, पार्थ मुंडे, प्रताप जाधव, विजय सावर्डेकर, बाबूराव कांबळे आदी सहभागी झाले होते.