कोल्हापूर : आयुष्यातील महत्त्वाची वर्षे संस्थेची सेवा करण्यात घालवायची आणि आयुष्याच्या संध्याकाळी तोकडय़ा निवृत्तिवेतनावर गुजराण करायची, ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवा केलेल्या दीड हजारावर कर्मचाऱ्यांची विवंचना आता कायमची संपुष्टात येणार आहे. याला कारण ठरले आहे ते बँक व्यवस्थापनाने गुरुवारी घेतलेला निवृत्तिवेतनात तब्बल चौपट वाढ करण्याचा निर्णय राज्यात अशाप्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती ही पहिली मध्यवर्ती सहकारी बँक बनली आहे.

दरमहा दोन ते अडीच हजारांची निवृत्तिवेतनाची रक्कम यापुढे पाच आकडय़ाचा उंबरठा ओलांडणार आहे. हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘संध्याछाया सुखविती’ असा म्हणायला लावणारा ठरला आहे. या निर्णयाचा लाभ पुढील काळात सेवारत पाच हजारांवर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याने सध्या या बँकेत ‘अच्छे दिन’ आल्याचा आनंद कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतीशी संबंधित व्यवहार करणाऱ्या बँका म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाहिले जाते. आता काही प्रमाणात या बँका व्यावसायिक प्रकारच्या सेवा देण्यास सज्ज होताना दिसत आहेत. यामुळे अनेक मध्यवर्ती बँकांतील कर्मचाऱ्यांना वेतन मर्यादित होते.  वेतनाचे आकारमान मर्यादित असल्याने निवृत्तिवेतन तरी किती असणार? तेही तसे तोकडेच. दरमहा दोन ते अडीच हजारांच्या निवृत्तिवेतनात महिना काढणे निवृत्त कर्मचाऱ्यांना जिकिरीचे बनलेले असते.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आणि ..

हाच मुद्दा एकदा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला असता न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी सुधारित नियमाप्रमाणे निवृत्तिवेतन देण्यास सांगून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या व्यवस्थापनाचे कान टोचले होते. न्यायालयाने बजावून सुद्धा आजही अनेक बँकांकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा कटू अनुभव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना येत आहे. आतापर्यंत देशात हरियाणा व केरळ या दोनच राज्यांनी ही सुधारित निवृत्तिवेतनाची योजना लागू केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने डी. एम. पाटील, बी. आर. यादव यांनी हा निर्णय बँकेत लागू करावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे निवृत्तिवेतन

आमच्या बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे दरमहा दोन ते अडीच हजारांचे निवृत्तिवेतन यापुढे चौपटीहून अधिक मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्त होताना असलेल्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके निवृत्तिवेतन मिळावे यासाठीही प्रयत्न करणार आहे, असे आमदार मुश्रीफ यांनी आज सांगितले. सुधारित नियमानुसार सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित फरकाची रक्कम एकाच वेळी अदा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.