कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विपणन विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण (वय ५५) यांचा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे वित्त व्यवस्थापक दीपक चव्हाण (वय ४०) व मोटार चालक हे दोघे गंभीर जखमी आहेत.

सोमवारी रात्री दहा वाजता रणवीर चव्हाण बँकेच्या मंत्रालयातील कामासाठी कोल्हापुरातून मुंबईला निघाले होते. त्यांच्यासमवेत दीपक चव्हाण होते. पहाटे चारच्या सुमाराला त्यांची गाडी खालापूर टोल नाक्याजवळ आली असता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने मोटारीला धडक दिली. जोरदार धडकेने दोनशे फूटहून अधिक फरपटत गेलेल्या मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या अपघातात चव्हाण हे जागीच ठार झाले. जखमी असलेले चव्हाण व मोटारचालक यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर पुढील उपचारासाठी वाशीला हलविले.

सायंकाळी सहाच्या सुमाराला पार्थिव बँकेच्या प्रांगणात आणण्यात आले. येथे संचालक मंडळ,कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह केंद्र कार्यालय व शहरातील शाखांमधील कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. रणवीर यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.