05 April 2020

News Flash

कोल्हापूर जिल्ह्य़ात माणूस-गवा यांच्यात वाढता संघर्ष

जंगल, अभयारण्य परिसरातील गव्यांचा वावर शेतीवाडीत वाढू लागल्याने लोक जीव मुठीत घेवून राहत आहेत.

|| दयानंद लिपारे

कोल्हापूर :  जंगल, अभयारण्य परिसरातील गव्यांचा वावर शेतीवाडीत वाढू लागल्याने लोक जीव मुठीत घेवून राहत आहेत. यामुळे ऐरवी शांत असणारा, गवा भीतीचे कारण ठरला आहे. गव्याचा बंदोबस्त करावा, या मागणीचा रेटा लोकप्रतिनिधींना शासनाकडे वाढत आहे. शासन सुद्धा काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत आहे. यातून माणूस-गवा यांच्यातील वाढता संघर्ष आटोक्यात येणार का याचे ठोस उत्तर सध्या तरी नाही.

कोल्हापूर जिल्ह्य़ात वन – जंगलाचा भूभाग मोठय़ा प्रमाणात आहे. उत्तरेकडील शाहूवाडी पासून ते दक्षिणेकडील चंदगड तालुक्यात पर्यंत अनेक ठिकाणी असा भाग आहे. खेरीज, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडिंग्लज, या तालुक्यांमध्ये ही जंगल-वन याचे प्रमाण लक्षणीय आहे.  वाघ-बिबटय़ा यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले हा विषय नेहमी चर्चेत असतो.

 तीन राज्यांत व्याप्ती

राधानगरी अभयारण्य हे तर खास गव्यांसाठी म्हणून प्रसिद्ध आहे राधानगरीसह अनेक तालुक्यांमध्ये गवा -माणूस यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढू लागला आहे. गवे रेडे – मानव हा प्रकार केवळ कोल्हापूर जिल्हा पुरता मर्यादित नाही तर तो कर्नाटक आणि गोवा येथे पर्यंत पसरलेला आहे. या सर्व भागांमध्ये मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. त्याची दाहकता वाढत चालली असल्याने त्यातून मानवी अस्तित्व आणि गव्याचे जगणे या दोन्हीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गव्याला मारून मांस, शिंगे याची तस्करी करणाऱ्यांना अटकाव करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची प्राणी प्रेमींची तक्रार आहे. तर दुसरीकडे आमचे दैनंदिन जगणे गव्यामुळे मुश्किल झाले आहे, असा अशा तक्रारी जंगल वन परिसरात राहणाऱ्या शेतकरी ग्रामस्थांकडून होत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असताना जंगलातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने गव्यांचा वावर गाव-खेडय़ांकडे वाढत असतो. तेथे असलेले उसासह अन्य हिरवे पिक हे त्याच्या जगण्याला पोषक असते. त्यातून शेती,बागायतीचे अतोनात नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. परिणामी गव्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. भुदरगड तालुक्यातील दोघेजण गव्याच्या हल्लय़ात ठार झाल्याने आणि अभयारण्य कर्तव्य बजावणाऱ्या वनसंरक्षक आच्या आईचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा गव्यांच्या हल्लय़ावरून संताप व्यक्त केला. अलीकडे अशा घटनांमध्ये आणखी भर पडल्याने चिंतेचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधींकडे हा जीवनमरणाचा प्रश्न सोडवला जावा, अशी मागणीसाठी आंदोलनही होत आहेत.

उपाययोजनांची गरज

दुसरीकडे, मानवी अस्तित्व सुरक्षित राहणे आणि गव्यांचा नैसर्गिक वावर ही कायम राहणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. यासाठी काही संयुक्त प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता वनविभाग, प्राणीप्रेमी, सेवाभावी संघटना, वन अभ्यासक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे उपाययोजना सुचवल्या पाहिजेत. शासनानेही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. तारेचे कुंपण घालण्याचा विचार अनेक वेळा बोलून दाखवला असला तरी त्याचे कृती होताना दिसत नाही. चर खोदण्याचा मुद्दाही अनेकदा पुढे आला तरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. तारेचे कुंपण करायचे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे काही गैरप्रकार घडण्याची भीती जंगल अभ्यासकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. त्यामुळे उपाययोजना करताना ती माणूस – गवा यांना सहाय्यभूत असण्याची गरज आहे.

आमदारांचे सामूहिक प्रयत्न

  • गव्यांकडून मानवी हल्लय़ाचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये यामध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे.
  • याकरिता तारेचे कुंपण घालणे, चर खोदणे, जंगलात पाणवठे करणे यासाठी शासनाकडे अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रयत्न केले.
  • गव्याचा हल्ला होत असलेल्या भागातील दहा-बारा आमदारांनी एकत्रित येऊन वन मंत्र्यांकडे असे हल्ले रोखण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
  • गव्याचे हल्ले मानवी अस्तित्वावर उठत असल्याने स्वसंरक्षणार्थ कठोर उपाय योजना करण्यास परवानगी मिळावी, असा आग्रह ही लोकप्रतिनिधी शासनाकडे धरीत आहेत, असे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शासनस्तरावर उपाय योजना 

जंगलातील प्राणी व व मनुष्य यांच्या संघर्ष होऊ नये असा वनविभागाचा प्रयत्न आहे. त्यातून पिकांचे नुकसान झाल्यास पिक प्रकार नुसार नुकसानभरपाई दिली जाते. व्यक्ती जखमी, गंभीर जखमी, वा मृत्यू झाल्यास त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते. गावांमध्ये तारेचे कुंपण लावण्याचा प्रस्ताव सादर केला असून याबाबत लवकरच उपाययोजना होईल, असे प्रादेशिक वन क्षेत्रपाल एस. बी. बिराजदार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 12:03 am

Web Title: kolhapur district man wild animal gava gaur fight akp 94
Next Stories
1 कोल्हापूरला दगावलेला रूग्ण करोनाचा नाही
2 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्य किराणा माल घेण्याची सक्ती
3 सामान्य यंत्रमागधारक बेदखल!
Just Now!
X