22 November 2019

News Flash

नियोजन मंडळ मिळूनही कोल्हापूर शिवसेनेत डावलल्याची भावना

कोल्हापूर : दोन्हीच्या दोन्ही खासदार, १० पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६ आमदार इतके भरभरून लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या पारडय़ात टाकणारा कोल्हापूर जिल्हा मंत्रिपदापासून यावेळीही वंचितच राहिला. शिवसेनेकडून कोल्हापूरला

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : दोन्हीच्या दोन्ही खासदार, १० पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६ आमदार इतके भरभरून लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या पारडय़ात टाकणारा कोल्हापूर जिल्हा मंत्रिपदापासून यावेळीही वंचितच राहिला. शिवसेनेकडून कोल्हापूरला मंत्रिपद मिळण्याचे स्वप्न आता याही विधिमंडळात स्वप्नच राहिले आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी  निवड  झाली असली आणि या पदास कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असला तरी मंत्रिपदाची सर या पदाला नाही याची खंत शिवसैनिक आणि कोल्हापूरकरांनाही जाणवत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असणारा कोल्हापूर जिल्हा आता शिवसेनामय झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात प्रबळ पक्ष म्हणून शिवसेनेची उभारणी झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील १० पैकी ६ विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाने यशाचा वेध घेतला होता. तर, लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेचे दोन वाघ दिल्लीला पोहोचले. अनेक वर्षांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकारले. शिवसेनेला भरभरून देण्यात कोल्हापूर जिल्ह्याने कसलीच कमतरता ठेवली नाही. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेकडून अपेक्षा वाढीस लागल्या. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ातील कोल्हापूर दौऱ्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला योग्य न्याय दिला जाईल, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. स्वाभाविकच, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरकडे मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरु झाली.

नियोजनाचे सूत्रधार

एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाच आमदार मंत्रिपदाच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरत होते. याबाबतीत शिवसेनेने मात्र हात आखडता घेतला आहे.  कोल्हापूर शहराचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची निवड राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी  झाली आहे. दुधाची तहान ताकावर भागविण्यात आली आहे. इच्छा किती आणि काहीही असली तरी परिस्थितीनुसार मिळतेजुळते घ्यावे लागते याची शिकवण जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आली आहे. नियोजन विभाग हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. नियोजन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे काम नियोज विभागाचे प्रमुख कार्य आहे. त्याशिवाय हा विभाग संस्थात्मक अर्थसहाय्य देणाऱ्या अभिकरणांमध्ये अधिक संपर्क साधून विकास योजनांसाठी अधिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असतो. हे जबाबदारी आणि जोखमीचे काम राजेश क्षीरसागर यांच्याकडे आले असून ते कमी काळासाठी का होईना पण राज्याच्या नियोजनाचे  मुख्य सूत्रधार बनले आहेत. यानिमित्ताने क्षीरसागर यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वजन वाढले आहे.

आयाराम पुढे, निष्ठावंत मागे

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित सरुडकर, प्रकाश आबिटकर व उल्हास पाटील हे सहा आमदार आहेत. यापैकी क्षीरसागर वा मिणचेकर यापैकी एकाची वर्णी मंत्रिपदी लागणार अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात शिवसेनेने कोल्हापूरच्या जनतेला ठेंगा दाखवला. शिवसेनेने मंत्रिपद देताना राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या तानाजी सावंत व  जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देण्यात आले.

First Published on June 18, 2019 12:34 am

Web Title: kolhapur district public representative not get place in fadnavis cabinet
Just Now!
X