राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर यांना राज्य मंत्रिपदी सोमवारी संधी मिळाली. जिल्ह्य़ाला तीन मंत्रिपदे मिळाल्याने महाविकास आघाडीचा राजकीय विस्तार होण्यास मदत होणार असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ातील हातकणंगले आणि चंदगड या नगर परिषदेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत नगराध्यक्ष सहित सत्ता स्थापन करून महाविकास आघाडीने ऐक्य आणि सत्ता प्राप्ती याची चुणूक आजच दाखवून दिली.

कोल्हापूर जिल्हय़ात महाविकास आघाडीचा प्रयोग लोकसभा- विधानसभा निवडणुकीतच झाला होता. त्यातून शिवसेना, काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना फायदा झाला होता. शिवाय, या तिन्ही पक्षांनी महापालिकेतसुद्धा सत्तेचा झेंडा रोवला होता. विधानसभा निवडणुकीत तर ‘काँग्रेसमुक्त’ करण्यास निघालेल्या भाजपला कोल्हापूर जिल्ह्य़ात ‘भाजपमुक्त’ होण्याची वेळ आली होती. तीही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्य़ातच. शिरोळमध्ये स्वाभिमानी आणि शिवसेनेचे आव्हान मोडून काढून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यांनी लगेचच शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांना राज्य मंत्रिपद मिळाले आहे.

 मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ

कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान टिकवून ठेवण्यात हसन मुश्रीफ यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक होता. मुश्रीफ यांनी अध्यक्ष झाल्यावर चार वर्षांत बँक तोटय़ातून नफ्यात आणून प्रशासकीय अनुभवाचा प्रत्यय आणून दिला. राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून महायुतीचा गेल्या पाच वर्षांचा कालावधी सोडता गेल्या वीस वर्षांत त्यांनी १५ वर्षे विविध खात्याची मंत्रिपदे सांभाळली आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना ‘भाजपमध्ये आल्यास त्यांचा उचित सन्मान केला जाईल’ असे सांगून अप्रत्यक्षरीत्या मंत्रिपदाचे आमिष दाखवले होते. मात्र, मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावरील आपली अढळ निष्ठा कायम ठेवत भाजपचा प्रस्ताव नाकारला.

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांचे नाव आल्यावर सर्वाच्याच भुवया उंचावल्या. शिवसेनेकडून दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारास मंत्रिपद देण्याचा शिवसेनेचा शब्द होता.  चंद्रकांतदादांना आव्हान

कोल्हापूर जिल्ह्य़ाला तीन मंत्रिपदे मिळाली असल्याने भारतीय जनता पक्षालाही आपले संघटन अधिक भक्कम करावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्य़ात काहीसा पडता काळ सुरू झाल्याचे आजच्या नगर परिषद निकालाने पाहावे लागले आहे. चंदगड व हातकणंगले या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपला अपयश आले असून महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. महाविकास आघाडीचे मूळचेच ऐक्य आणि त्याला मिळालेली तीन मंत्रिपदाची जोड यामुळे या आठवडय़ातच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता राखणे हे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

सतेज पाटील यांचे संघटनात्मक कसब

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा कोल्हापूरचा भक्कम गड पूर्णपणे ढासळला. या जिल्ह्य़ात एकही आमदार निवडून येऊ  शकला नाही. यावेळी विधानसभा निवडणुकीस अवघ्या दोन महिन्यांचा अवधी हाती असताना सतेज पाटील यांच्यावर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. पडत्या काळाचे आव्हान स्वीकारून सतेज पाटील यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी यांच्यात ऐक्य ठेवले. त्यातून कोल्हापूर जिल्ह्य़ात काँग्रेसचे सर्वाधिक चार आमदार निवडून आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ासाठी मंत्रिपद देताना काँग्रेस नेत्यांसमोर पक्ष विस्तार करणारे सतेज पाटील की ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद द्यायचे असा पेच निर्माण झाला होता. यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे.