चंद्रकांत पाटलांसह आणि तीन मंत्र्यांची कसोटी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता नाटय़ भलतेच रंगले आहे. भाजपची सत्ता काढून घेण्याचे  प्रयत्न नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने चालवले आहेत. मात्र, मंत्रिपदावरून काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेली धुसफूस,शिवसेनेच्या ऐक्यावर लागलेले प्रश्नचिन्ह,  उभय काँग्रेसमधील  नाराजी नाटय़ यामुळे महाविकास आघाडीला सत्ता मिळवणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.  याचवेळी जुन्या मित्रपक्षांची सोबत घेऊ न सत्ता टिकवण्याची शिकस्त भाजपने चालवली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ,काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे तीन मंत्री यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा होण्याची चिन्हे  आहेत. आज दिवसभरात तासातासाला घडामोडी बदलत राहिल्यानेअध्यक्ष निवडीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सातत्याने काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता राहिली. गेल्यावेळी चुरशीने निवडणूक होऊ न भाजप व काँग्रेसनेही प्रत्येकी १४ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा करिष्मा दाखवत शौमिका महाडिक यांच्या रूपाने पहिला भाजपचा पहिला अध्यक्ष बनवला.  त्यांची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी उद्या गुरुवारी सभेचे आयोजन केले आहे.

काँग्रेसमध्ये धुसफूस

लोकसभा, विधानसभा निवडणुका नंतर राजकीय समीकरण बदलले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे प्रयत्न पाटील, मुश्रीफ यांनी चालवले आहेत. त्याला शिवसेनेकडून साथ मिळणार असल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे चौदा, राष्ट्रवादीचे ११ आणि शिवसेनेचे १० तसेच मित्र पक्ष असे ४० सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील नाराज झाले आहेत. सहलीला गेलेले त्यांचे तीन सदस्य परत आले आहेत. काँग्रेस—राष्ट्रवादीचे चार सदस्य पाठिंबा देण्याबाबत निश्चित आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता घेणे हे काँग्रेससमोर आव्हान आहे.

शिवसेनेच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेतील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली होती. दहापैकी सात सदस्य भाजपकडे राहिले होते, तर तिघांनी काँग्रेस—राष्ट्रवादी सोबत विरोधात बसणे पसंत केले होते. याची दखल घेऊ न दुधवडकरांनी जिल्ह्यतील स्थानिक प्रमुखांशी चर्चा केली.  त्यानंतर शिवसेना महाविकास आघाडी सोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला. मात्र याच वेळी त्यांनी अध्यक्षपद शिवसेनेकडे दिले पाहिजे, अशी अट घातली आहे. शिवसेनेचे वरकरणी ऐक्य दिसत असले तरी ते सभागृहात कायम राहणार का याबाबत पूर्वानुभव पाहता प्रश्नचिन्ह  लागले आहे. कदाचित काँग्रेस अंतर्गत वादातून पर्याय म्हणून शिवसेनेचा उमेदवार अध्यक्षपदासाठी उभा करून निवडून आणण्याचा पर्याय शोधला जात असल्याचेही रात्रीच्या घडामोडीतून दिसत होते.

भाजपची सत्ता राखण्याची कसोटी

गेल्या अडीच वर्षांत राज्यात सत्ता असल्याने भाजपला अंतर्गत मतभेद असतानाही सत्ता राखणे सोपे गेले. आता भाजप विरोधी बाकावर असल्याने साहजिकच पूर्वीचा राजकीय प्रभाव राहिलेला नाही. अशा स्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता राखणे ही प्रदेशाध्यक्ष  पाटील यांची कसोटी असणार आहे. अशा स्थितीत आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी आणि महाडिक परिवार यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून भाजपचे सत्ता टिकवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.