चौथी मुलगी जन्मल्याच्या रागातून ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे सहा दिवसांपूर्वी नवजात अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी बापासह तिघांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी न्यायालयाने २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. धोंडिबा जोतिबा कुंभार, वनिता धोंडिबा कुंभार, लक्ष्मण बाळकू कुंभार अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

विटा बनवण्याचा व्यवसाय असलेल्या धोंडिबाला तीन मुली आहेत. १४ मे रोजी चौथे अपत्य मुलगीच जन्मल्याने त्याने तिची हत्या केली होती. याचा बोभाटा झाल्यावर यानंतर त्याने पोलिसांना अर्भक मुलगा होता, पण जन्मजात तो मृत असल्याने हिरण्यकेशी नदीत टाकल्याचे पोलिसांना खोटे सांगितले होते.

सुरुवातीला पोलिसांनी त्याच्यावर स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा दाखल न करता अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधव व पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी धोंडिबाला पोलिशी खाक्या दाखवून सत्य वदवून घेतले. त्यानंतर त्याने अर्भक नदीत टाकले नसून पुरल्याचे सांगितले. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अर्भक हे स्त्री असल्याचे स्पष्ट झाले.

‘चिंगी’च्या गावात चिंगीचा घोटला गळा

समाजातील स्त्री भ्रूणहत्येसारख्या ज्वलंत प्रश्नावर प्रातिनिधिक स्वरूपात पुढे आलेल्या स्त्री वेदनेचे दर्शन घडविणारी ‘चिंगी’ फ्रान्स येथे चित्रपट महोत्सवात दाखल झाली होती. या चित्रपटाचे लेखक प्रा. किसनराव कुराडे यांच्या गावात म्हणजे ऐनापूरमध्ये एका चिंगीचा जग पाहण्यापूर्वीच अंत झाला. या दुर्दैवी प्रकाराची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात प्रगतीचे पाऊल झेपावत असताना अजूनही जुन्या चालिरिती, परंपरा यांचा पगडा दिसतो. वंशाला कुलदीपक हवा हा अप्पलपोटीपणातून झालेल्या कृत्यावर समाज माध्यमातून टीका होत आहे.