24 January 2020

News Flash

कोल्हापुरात महापुराची तीव्रता वाढली; मदतकार्याला जोर

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी महापुराची तीव्रता वाढीस लागली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे.

कोल्हापूर शहराला आठवडाभर पावसाने झोडपून काढल्याने शहर जलमय झाल्याचा प्रसंग शिवम बोधे यांनी टिपला आहे.

एनडीआरएफ, नौदल, लष्कराचे मदतकार्य; ५५ हजार नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर जिल्ह्यतील महापुराची स्थिती आज तिसऱ्या दिवशी आणखी गंभीर झाली आहे. सकाळी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारनंतर जोरदार कोसळण्यास सुरुवात केल्याने स्थिती अजून गंभीर बनली आहे. पंचगंगा नदी बुधवारी धोकापातळीपेक्षा १३ फूट अधिक उंचीने वाहत असून अन्य नद्यांनी महापुराचा नवा विक्रम नोंदवला आहे. एनडीआरएफ, नौदल, लष्कराच्या जोडीने स्थानिक तरुणांनी या भागात मदतकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्य़ातून तब्बल ५५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी महापुराची तीव्रता वाढीस लागली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. शहरात पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी आज कोल्हापुरात धाव घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला, तर विरोधी गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पूरग्रस्तांना शासनाने नशिबाच्या हवाल्यावर सोडले,  अशी टीका करीत ढीसाळ प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यत महापुराची भीषणता वाढत आहे. त्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. ५५ बोटी सध्या जिल्ह्यमध्ये पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करीत आहेत. पाऊस थांबत नाही तोपर्यंत आपल्या मर्यादा आहेत. तरीही सर्व आपत्कालीन यंत्रणा फिल्डवर कार्यरत आहेत. शिबिरात आणल्यानंतर त्यांना जेवण पुरवणं आणि औषधोपचार करणं हे महत्त्वाचं काम सुरु आहे.

कोल्हापूरला आलेले पालकमंत्री पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत आज कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी केली. पुणे — बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या पाण्याची पाहणी करुन, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी महावीर महाविद्यालय येथील रेस्क्यू ऑपरेशन, छत्रपती शाहू विद्यालयातील पूरग्रस्त शिबिराला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर लिफ्टींगबाबत समन्वय सुरु आहे, अशी माहिती पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

अलमट्टी विसर्गाच्या अडचणी – महाजन

कर्नाटक राज्याच्याही विसर्ग सोडण्याबाबत अडचणी आहेत. तरीही सर्व यंत्रणांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री  महाजन यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार संजय मंडलीक,  पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

शेतमालाची आवक घटली

जिल्ह्यतील पूर परिस्थितीमुळे शेतातील भाजीपाला काढून बाजारात आणणे कठीण बनले आहे . येथील शाहू मार्केट यार्ड येथील भाजीपाला व फळांची आवक आज घटली. कोल्हापूर कडे येणारे बहुतांशी रस्ते बंद असल्याने अवघ्या सात ते आठ गाडय़ा मार्केट यार्डात येऊ  शकल्या. आणखी दोन दिवस तरी हा तुटवडा जाणवेल असे सांगण्यात येत आहे.

पूरग्रस्तांना १० हजारांची मदत- हाळवणकर

कोल्हापुर जिल्ह्यतील ज्या घरांमध्ये दोन दिवस पाणी आले आहे अशा कुटुंबांना महाराष्ट्र शासनाने १० हजार रुपये थेट मदत मंजूर केली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना कळवले आहे.  घरांचे तातडीने पंचनामे करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर दहा हजार रुपये मदत तातडीने देण्याचा आदेश दिला आहे.

आमदारांचे मदतकार्य

आमदार सतेज पाटील यांच्या वतीने बापट कॅम्प, बहुउद्देशीय हॉल, कसबा बावडा, लाईन बाझार, न्युपॅलेस,वळीवडे, उंचगाव,वसगडे, पूरग्रस्त नागरिकांना ११०० ब्लँकेट, पाणी, चहा दिवसभरात १ हजार  लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. करवीर तालुक्यातील  बापू ज्ञानू पाटील यांचे शिरोळ  येथे  निधन झाले.

त्यांचे पार्थिव पडळ गावी नेत असताना बालिंगे(ता. करवीर) येथे पुराचे पाणी होते.  पण आमदार चंद्रदीप नरके यांनी  पुढाकार घेत कार्यकर्त्यांच्या मदतीने पार्थिव  पुराच्या पाण्यातून घेऊन दोनवडे येथे घेऊन गेले.

महाबळेश्वर पोलादपूर मार्ग खचला

वाई : महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊ स सुरू आहे. मागील २४ तासांत साडेदहा इंच पावसाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी वाई परिसरात अनेक भागातील रस्ते जमिनी मोठय़ा प्रमाणात खचले आहेत. महाबळेश्वर पोलादपूरकडे जाणारा मार्गही खचला असल्याने महाबळेश्वर मार्गे मुंबईकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरातील मुसळधार पावसाने बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आज पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी पावसाचा जोर कायम आहे. वेण्णा लेक लिंगमळा परिसरातही पाणी रस्त्यावरून वाहत आहे. महाबळेश्वर जोर व जावळी खोरे येथे पावसाने उसंत घेतल्याने धोम धरणातून २० हजार क्युसेक आवक होत असून धरणातून कृष्णा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे . या पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी वाई तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक मार्ग, वीज वितरण व मोबाइल संपर्क नसल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ते व जमीन खचणे असे प्रकार घडत आहेत. मांढरदेव घाटामध्ये दरड कोसळल्याने व जोरदार पाऊ स झाल्यामुळे काळुबाई मांढरदेव रस्ता बंद झाला आहे . पावसाने अनेक भागातील पिके वाहून गेली आहेत. एकूणच महाबळेश्वर जावली वाई परिसरात पावसाची उघडझाप सुरू झाली आहे. तरीही ओढे-नाले भरून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने प्रमुख मार्ग बंद आहे.

धाडसी महिलेचे आगळे वेगळे मदतकार्य!

पुणे : कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यावर डॉ. नंदिता परांजपे या धाडसी महिलेने आगळे वेगळे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करून सुमारे पन्नास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. ‘आयर्न मॅन’ या साहसी स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या डॉ. परांजपे कोल्हापूर येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नंदिता परांजपे-जोशी, त्यांचे पती डॉ. मधुर जोशी आणि चार वर्षांची मुलगी नभा कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात राहतात. पंचगंगेचे पाणी सोमवारी रात्री शहरात भरण्यास सुरुवात झाली. त्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. मित्राच्या घरी जायचे म्हणून नंदिता आणि कुटुंबीयांनी तयारी केली. मदतीसाठी राज आणि आकाश कोरगावकर यांचा संघ सर्वप्रथम पोहोचला, मात्र अडकलेले नागरिक आणि मदतीचे स्रोत यांचे प्रमाण व्यस्त असल्याने आपण देखील मदतीला हातभार लावावा, असा निर्णय डॉ. नंदिता यांनी घेतला. चार वर्षांच्या नभाला ‘बाथ टब’मध्ये बसवून, त्यासह पोहत पोहत त्यांनी तिला सुरक्षित ठिकाणी नेले. दरम्यान, आसपास सुमारे चारशे नागरिक अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. सात ते आठ फेऱ्या पूर्ण करत आपल्या छोटय़ा कुत्र्यासह सुमारे पन्नास लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले. त्यासाठी प्लायवूडचे तुकडे, कॅन जोडून तयार केलेल्या तराफ्यांचा वापर त्यांनी केला. डॉ. नंदिता म्हणाल्या, साहसी खेळांची आवड असल्याने कोल्हापूर येथे ‘आयर्न मॅन’ या स्पर्धेचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे पोहणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग या गोष्टी माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे पाण्यात उतरून रेस्क्यूमध्ये सहभाग घेण्याची भीती वाटली नाही. अनेक स्थानिक नागरिक, अग्निशामक दल आणि इतर यंत्रणाही सर्व तयारीनिशी मदतीसाठी दाखल झाले होते, मात्र पुराचा आवाका, अडकेलेले नागरिक यांचे प्रमाण गंभीर होते. त्यामुळे आपण देखील शक्य तेवढय़ा लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे वाटले, त्यातून हे काम केले. प्रशिक्षक शुभम बुवा याने या कामात मोलाचे सहकार्य केले.

First Published on August 8, 2019 1:08 am

Web Title: kolhapur floods intensify increased abn 97
Next Stories
1 कोल्हापूर, सांगलीत पावसाचा कहर, बचावकार्य सुरु असताना बोट उलटली
2 सांगली, कोल्हापुरात महापूर
3 कोयनेतून सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग
Just Now!
X