18 November 2017

News Flash

कोल्हापूरच्या पठ्ठ्याची फुटबॉल किक थेट युरोपात

विविध स्पर्धांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये जाऊन आला आहे.

प्रतिनिधी , कोल्हापूर | Updated: July 6, 2017 10:30 PM

कोल्हापूरमध्ये  कुस्तीची रग  जशी आहे तसेच वेड आहे ते फुटबॉलचे .  क्रिकेटवर प्रेम आहे पण जीव गुंतला  आहे तो फुटबॉल मध्येच . त्यामुळेच करवीरनगरीतल्या  पेठां-पेठांमध्ये फुटबॉल वारे वाहत असते . अशा या फुटबॉल वेड्या कोल्हापुरातील अनिकेत जाधव आता भारतीय फुटबॉल संघामध्ये प्रतिनिधीत्व करत युरोप गाजवतो आहे .

क्रिकेटवेडय़ा देशात फुटबॉल फीव्हर ही तशी दुर्मीळच गोष्ट. पण त्याला सिद्ध केले जाते कोल्हापुरात . शालेय दशेपासूनच येथे फुटबॉलचे वेड लागते आणि सोबतच या खेळाचे प्रशिक्षणही. त्यामुळे पेठांतच नव्हे तर गल्लीबोळात फुटबॉलचे वेड नसानसात भिनलेले पहायला  मिळते . त्यातून उसळणारी फुटबॉलची झिंग , आपलाच संघ जिंकावा यासाठी केला जाणारा आटापिटा , त्यातून थेट मारामारीला आमंत्रण आणि संघाच्या प्रेमाखातर चार  द्यायचे नी दोन घ्यायची कधीही तयारी . अशा भारलेल्या  वातावरणात येथे फुटबॉलचा खेळाडू घडतो . आपल्या संघाने जेतेपद मिळवावे यासाठी प्रतिस्पर्ध्याला भिडतोही . अशा जिद्दी खेळाडूंची कोल्हापूर जणू खाणच . या परंपरेतील एक  तेजस्वी , चमकदार हिरा म्हणजे अनिकेत जाधव .

कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातील हा उगवता तारा आज भारताच्या १७ वर्षाखालील फुटबॉल संघामध्ये  चमकदार कामगिरी करत आहे . युरोपमधली स्पर्धा संपवून तो नुकताच कोल्हापूरमध्ये परतला आहे. त्याच्या या भरीव कामगिरीमुळे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी त्याच्या मित्रपरिवाराने फक्कड  गर्दी केली आहे .

सामान्य कुटुंब ..असामान्य कामगिरी
अनिकेतच्या घरी परिस्थिती अगदी बेताची .वडील अनिल जाधव हे रिक्षाचालक. तर आई गृहिणी . घरच्या परिस्थितीमुळे  अनिकेतच्या खेळामध्ये कधी अडसर होणार नाही याची काळजी या दोघांनी घेतली . याचे भान ठेवत अनिकेत खेळात अव्याहत कष्ट उपसत राहिला . त्याच्या जोरावरच  सामान्य कुटुंबातील अनिकेतने सातासमुद्रापार खेळण्याची  झेप घेतली आहे . पुत्राच्या या कामगिरीबद्दल. वडील अनिल जाधव , आई  यांनी अभिमान वाटत असल्याचे सांगितले .

विश्वचषकामध्ये भारताचे  पोहोचवायचे
अनिकेत विविध स्पर्धांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये जाऊन आला आहे. त्यामुळे  इतर देशांमध्ये खेळाडू घडवण्याची पद्धत आणि आपल्या देशात खेळाडू घडवण्याची पद्धत यामध्ये मूलभूतरित्या  यामध्ये फरक असल्याचे  सांगतो. आपल्या महाराष्ट्रात खेळाडू घडवण्याची प्रक्रीया शालेय स्तरापासून व्हावी असे अनिकेतला वाटते . इटली, ब्राझील, जर्मन सारख्या देशांनीच फुटबॉलमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे .मात्र आता विश्व चषकामध्ये भारताचे  नाव जगभर पोहोचवायचे आहे , अशा शब्दात अनिकेतने आपली आकांक्षा  बोलून दाखवली .त्याच्या या कामगिरीला आणि पुढील वाटचालीला कोल्हापूरकर भरभरून शुभेच्छा देत आहेत . वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे  उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी अनिकेतच्या पाठीशी फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकर राहतील , असा विश्वास गुरुवारी व्यक्त केला .

अनिकेत विषयी थोडे
२००० साली शाहुपुरीत जन्म  . ८ वर्षाचा असताना पुणे येथे  सराव सुरु . सुरुवातीला तो लेप्ट बॅक पोझिशनला खेळायचा . प्रशिक्षकांच्या  सांगण्यावरुन फोरवर्डला खेळण्यास सुरुवात . राईट आणि लेफ्ट विंग यासह स्ट्राईकर या त्याच्या आवडत्या खेळाच्या जागा .

First Published on July 6, 2017 9:57 pm

Web Title: kolhapur football player aniket jadhav outstanding performing in football tournaments of europe