कोल्हापूर

गरीब महिलांना कर्जाचे आमिष दाखवून संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संजय रामचंद्र कलबुर्गी (वय ४३) आणि अवधुत दिलीप शिंदे (वय २०) या दोघांना अटक केली आहे. याबाबत रुपाली सुनिल गजरे (३२) या महिलेने फिर्याद दिली होती.

इचलकरंजी येथील सागर सत्यनारायण मोदाणी (वय ३५), संजय कलबुर्गी आणि अवधुत शिंदे या तिघांनी हुपरी मधील रुपाली गजरे आणि त्यांच्या सोबतच्या महिलांना एका प्रतिष्ठित कंपनीकडून व्यवसासाठी कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन केला. त्यांच्याकडील पॅनकार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक अशी कागदपत्रे घेऊन त्यांना गावातील गांधी पुतळ्याजवळील न्यू फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये बोलावून घेतले. तिघांनी गजरे यांची कागदपत्रे स्कॅन करून मोबाईलचा रिकामा बॉक्स गीता मानसिंग माने, उषा वसंत जाधव, सुमन विश्‍वास माने यांच्या हातात देवून त्यांचे फोटो काढले. सदरचे फोटो कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मोबाईल खरेदी केल्याचे दाखवून त्यांच्या बँक खात्यातून मोबाईल हप्त्याचे १५८० रुपये वजा करून घेतले. याबाबत गजरे यांनी संशयित तिघांनी संगनमताने फसवणूक केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर याबाबत तपास करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.