कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात दि. १८ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे होणार असल्याची माहिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशात इराण, कझाकिस्तान, टर्की, चीन, इटली, अफगाणिस्तान आदी देशांचा समावेश आसणार आहे. विविध भारती या भारतीय सिनेमा विभागात िहदी, बंगाली, कन्नड, मल्यालम या राज्यांचा समावेश असेल. विदेशी लक्षवेधी दिग्दर्शक तसेच भारतीय लक्षवेधी दिग्दर्शक यांचे चित्रपट असतील. लक्षवेधी देश म्हणून मेक्सिकोचे चित्रपट असतील. माय मराठी विभागात नव्या चित्रपटांचा समावेश असून त्यांना प्रेक्षक पसंती व परीक्षक पसंती पुरस्कार देण्यात येतील. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री व पटकथाकार निवडले जातील.
महोत्सवात एकूण ५० चित्रपट, ६० लघुपटांचा समावेश असेल. ज्येष्ठ दिग्दर्शकास कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार तर चित्रतंत्रासाठी ज्येष्ठ व्यक्तीस आनंदराव पेंटर पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी प्रेक्षकांनी सदस्यत्वाची नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट, चित्रपट महामंडळाचे सुभाष भुर्के, मिलिंद अष्टेकर आदी उपस्थित होते.
  चित्रपट महोत्सवाचे आकर्षण
भारतीय सिनेमाच्या कारकीर्दीत सन १९५० ते १९६० हे दशक अतिशय महत्त्वाचे आहे. विशेषत १९५५ साली निर्माण झालेल्या रौप्य व सुवर्ण महोत्सव करणारे चित्रपट अधिक असून त्यांना यंदा ६० वर्ष पूर्ण होत आहेत. असे काही निवडक चित्रपटही महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.