14 August 2020

News Flash

खरीप पीक कर्ज वितरणात कोल्हापूरची राज्यात आघाडी

साडेसोळा लाख शेतकऱ्यांना १७१७ कोटींचे वितरण

संग्रहित छायाचित्र

दयानंद लिपारे

राज्यातील खरीप हंगाम पीक कर्ज वितरण रखडल्याने त्यावरून तक्रारींचा मारा होत असताना कोल्हापूर जिल्ह्याने खरीप पीक कर्ज वितरणामध्ये राज्यात आघाडी घेतली आहे. सहकारी बँकांनी उद्दीष्टाच्या २१२ टक्के कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना हात दिला आहे. कर्जवाटपात प्रारंभी अवघे दोन टक्के वाटा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी आता ५४ टक्के तर खासगी बँकांनी ३६ टक्के कर्ज वाटप करून समाधानकारक कामगिरी केली आहे.

जिल्ह्यात साडेसोळा लाख शेतकऱ्यांना १७१७ कोटी रुपयांची रक्कम वितरित झाल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

खरीप पीक कर्जवाटप हा यंदा पावसाळ्यात वादग्रस्त मुद्दा बनला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने किंवा बँका सहकार्य करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. पावसाळ्याच्या प्रारंभी बियाणे-खते खरेदीसाठी लगबग सुरू असते पण कर्ज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. याची दखल घेत कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही बँकांमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ करून कर्ज वाटप न केल्यास कारवाई करावी लागेल असा इशारा दिला होता.

जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवडय़ामध्ये ५८९ कोटी रुपये कर्ज वितरण झाले होते. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बँकेचे ५०४ कोटी रुपये होते. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वाटप होऊन ६४ हजार खातेदारांना कर्ज मिळालेले होते. जूनअखेर कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश भुसे यांनी दिल्यानंतर कर्ज वाटपाला गती मिळाली. आता जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये कर्ज वाटपाचे प्रमाण बऱ्याच अंशी सुधारलेले आहे. प्रारंभी २ टक्के कर्ज पुरवठा असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांनी ५४ टक्के  (३७५ कोटी उद्दिष्ट / वाटप २०२ कोटी), खासगी बँकांनी ३६ टक्के (१८० कोटी उद्दिष्ट/ ६४ कोटी वाटप) केले आहे. सहकारी बँकांची आघाडी कायम आहे. त्यांनी ६८५ कोटींचे उद्दिष्ट असताना १४५१ कोटी रुपये म्हणजे तब्बल २१२ टक्के कर्जवाटप केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील चौदा लाख खातेदारांना कर्ज वाटप केले आहे. एकंदरीत कर्ज वाटपावर नजर टाकता जिल्ह्यात १२४० कोटी रुपये उद्दिष्ट असून त्यातील १७१७ कोटी रुपयांची रक्कम वितरित झाली आहे. साडेसोळा लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळाले असून एकूण टक्केवारी १३८ टक्के आहे. यामुळे खरीप पीक कर्ज वाटप जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘किसान क्रेडिट’ वाटपाला गती

दरम्यान, टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वित्तसाहाय्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय निर्धार आहे. यातून पंतप्रधान किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पूरक व्यवसायात अग्रस्थानी असलेल्या दुग्ध व्यवसायाला अर्थसा केले जाणार आहे. प्रति जनावर प्रतवारीनुसार हजार रुपये कर्ज दिले जाणार असून त्याची मर्यादा २० हजारांपर्यंत मर्यादा आहे. या अंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. १९ जुलै रोजी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. हा दिवस किसान महिना म्हणून देशभर साजरा केला जातो. या वर्षी १९ जुलैला रविवार असल्याने २० जुलैला हा दिवस साजरा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:12 am

Web Title: kolhapur leads in kharif crop loan disbursement in the state abn 97
Next Stories
1 दुग्धविकास मंत्र्यांकडे गायीचे दूध पाठवून भाजपाकडून दरवाढीची मागणी
2 कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर लॉकडाउन; पहिल्याच दिवशी सर्वत्र शुकशुकाट
3 Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे चार बळी
Just Now!
X