कोल्हापूर

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची माल वाहतूक करणारे वाहन भुदरगड तालुक्यात पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान २३ लाख ३ हजार किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले. हे मद्य गोवा बनावटीचे होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्यासह एकूण ३२ लाख ८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याशिवाय मूळचा कारवार येथील असलेला वाहनाचा २९ वर्षीय चालक हरिश केशव गौडा यालाही ताब्यात घेण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी या कारवाईची माहिती दिली. “अशा प्रकारची वाहतूक होणार आहे या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत चौकातच सापळा लावला. तेथे आलेल्या वाहनांची कसून तपासणी केली जात होती. या तपासणीमध्ये हौद्यामध्ये वर असलेल्या चोर कप्प्यात विविध कंपनीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळले. त्यामुळे वाहनचालकाला ताब्यात घेण्या आले. जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या मद्याची बाजार भावानुसार किंमत सुमारे २३ लाख ३ हजार इतकी आहे”, असेही राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.