18 October 2019

News Flash

नवरात्र उत्सवासाठी करवीरनगरी सज्ज

महालक्ष्मी मंदिरात विविध सुविधा

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात रविवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. उत्सव सुरू होत असताना मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.  (छाया- राज मकानदार)

 

शारदीय नवरात्र उत्सवासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. उद्या रविवारपासून या उत्सवाला सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. राज्यभरातून येणाऱ्या लाखो भक्तगणांच्या स्वागतासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे.

साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर महालक्ष्मी मंदिरातील स्वच्छता आणि मंडप उभारणीची कामे गतीने सुरू होती. ती आता पूर्ण झाली असून मंदिर आवारातील वीज-प्रकाश व्यवस्था, बिनतारी यंत्रणा आणि अन्य व्यवस्थेच्या दुरुस्तीचा आढावा देवस्थान समितीकडून घेण्यात आला आहे. सरलष्कर भवन परिसरातील दर्शन मंडप, सांस्कृतिक कार्यक्रम मंडप, पावती-प्रसाद मंडप बांधून तयार आहे. मंदिराच्या भोवतीने विद्युत रोषणाई करण्यात आल्याने या पुरातन मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, याची तयारी देवस्थान समितीने केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या वर्षी नवरात्रोत्सवात देवीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवरात्र उत्सवात भाविकांना भजन, कीर्तन, शास्त्रीय नृत्य, भावभक्तिगीते यांचा आस्वाद घेता यावा यासाठी यंदाही महालक्ष्मी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उत्सव शांतता आणि मंगलमय वातावरणात पार पडेल असे नियोजन केले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

First Published on September 29, 2019 1:02 am

Web Title: kolhapur mahalaxmi temple ready for navratri festival abn 97