कोल्हापूर- शेतकरी आंदोलनाचे लोण आता बाजार समित्यांमध्ये पोहोचले असून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर बाजार समितीतील माथाडी कामगारांनी आज काम बंद आंदोलन केले. यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर लक्षणीय परिणाम झाला. विशेषत: कांदा उलाढाल व्यवहार बंद राहिली. त्यामुळे आज दिवसभर कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात सामसूम असल्याचे दिसून आले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करतानाच आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरात माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. याचा परिणाम कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहायला मिळाला. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली साडेतीनशे माथाडी कामगारांनी यात सहभाग नोंदवला असल्याने त्याचा आर्थिक उलाढालीवर दिसला. रविवारी कांदा आवक बंद राहिल्याने आज कांदा बटाट्याचे व्यवहार बंद राहिले. शनिवारी ५० किलोची ८,९६९ पोती कांदा आवक झाली होती. तर, अमावस्या असल्याने गूळ व्यवहार बंद होता. पण भाजीपाला विभागात ९,२६५ क्विंटल भाजीपाला आवक झाली असून तेथे बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित आहेत, असे बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कोल्हापूरच्या बाजार समितीच्या आवारात कायम गर्दी असल्याची दिसते. पण माथाडी कामगार बंदमुळे बाजार समितीत नेहमीची घाई आज दिसली नाही. व्यापारी, अडते आणि किरकोळ विक्रेत्यांची गर्दी तेवढी थोड्या प्रमाणात दिसून आली. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासहित माथाडी कामगार संघटनेनेदेखील काही मागण्या केल्या. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून करोनामुळे मृत झालेल्या कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई देणे, माथाडी कामगारांना कामावर येण्या-जाण्यासाठी रेल्वे तिकीट देणे आणि माथाडी कामगारांच्या कामात शिरकाव केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालणे या प्रमुख तीन मागण्या माथाडी कामगारांच्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 14, 2020 4:37 pm