23 February 2019

News Flash

कोल्हापूर महापौर निवडीसाठी घोडेबाजार

गुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीसाठी महापालिकेत पुन्हा एकदा घोडेबाजार रंगात आला असून फुटीरांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणाची तयारी सुरू आहे.

आज निवडणूक

कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या खुर्ची काबीज केल्यानंतर आता भाजपने महापौर निवडीसाठी जोरदार हाचलचाली सुरू केल्याने कोल्हापुरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या (गुरुवारी) महापौर पदाची निवड प्रक्रिया होणार आहे.

अडीच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर बहुमत मिळाले नसतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर करण्याची घोषणा केली होती, तेव्हाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत. तर, हातातील सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीचा  सावध पवित्रा  बदलून ‘एक फोडला तर दहा फोडू ‘ अशी आक्रमक नीती आरंभली आहे. यामुळे उद्या, गुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीसाठी महापालिकेत पुन्हा एकदा घोडेबाजार रंगात आला असून फुटीरांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणाची तयारी सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटले. त्यामुळे  भाजपाचे आशिष ढवळे  सभापती झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार  शहरात असतानाच भाजपने हा बॉम्ब फोडला. यासाठी फुटीरांना दीड कोटी दिल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने फुटीर नगरसेवकांच्या घरासमोर निदर्शने केली होती. या घटनेला जेमतेम दोन महिने उलटले असताना आता भाजपने उभय काँग्रेसला ‘दे धक्का ‘ धोरण अवलंबले आहे. अर्थात ही भाजपाची पहिलीच सत्ताकांक्षा नाही.

पालकमंत्री सुरुवातीपासून प्रयत्नशील 

महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस आघाडीने  शिवसेनेचे चार  नगरसेवक सोबत घेऊ न संख्याबळ ४४ इतके भक्कम  केले.  तर विरोधी भाजपा—ताराराणी आघाडीकडे ३३  नगरसेवक राहिले. अशाही वेळी  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळेच कोल्हापूर शहराचा सर्वागीण विकास होण्यासाठी महापालिकेत भाजप—ताराराणी युतीचा महापौर करण्याचा आटापिटा आम्ही करत आहे’, असे सांगत सत्तेवर दावा केला होता. आघाडीचे ३२ नगरसेवक सोडून उर्वरित सर्व नगरसेवकांनी भाजप ताराराणीच्या महापौर—उपमहापौरपदाच्या उमेदवारांना पाठिंबा  द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.

तेव्हा त्याचे सत्तास्वप्न साकार झाले नाही. पण स्थायी समिती निवडीतील अर्थपूर्ण राजकारण सत्ता बदलास कारणीभूत ठरते, हे लक्षात आल्याने भाजपने याची पुनरावृत्ती करून महापौर पक्षाचा करण्यासाठी कंबर कसली आहे.

सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता

भाजपचा पवित्रा  पाहून सत्ताधारी गोटात अस्वस्थता आहे. आपले नगरसेवक गळाला  लागू नयेत यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून नाराजांचे  मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पक्षाच्या ज्येष्ठ  नेत्यांनीही याचा धसका घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ‘भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना भरभक्कम रक्कम देऊ न फोडले. घोडेबाजार करून भाजपचा सभापती केला. भाजपकडे कुठून एवढा पैसा आला’, असा सवाल केला आहे.  तर, आमदार मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील घोडेबाजार संपवण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या एका बैठकीचा हवाला देऊ न भाजपने घोडेबाजार टाळावा, असे आवाहन केले आहे.

घोडेबाजाराचा इतिहास

महानगरपालिकेत घोडेबाजार चालता  कामा  नये अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली असली तरी ते ज्या विधान परिषद मतदारसंघातून निवडून आले तेव्हा कोणता मार्ग अवलंबला होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवताना सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना पराभूत केले खरे, पण तेव्हा  त्यांनी अवलंबलेला मार्ग काही वेगळा नव्हता. तेव्हा ते घोडेबाजारात पारंगत असलेल्या महाडिक यांना  पुरून उरले इतकेच.

First Published on May 25, 2018 3:20 am

Web Title: kolhapur mayor election kolhapur municipal corporation