अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या अटकेतील चौघा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी इचलकरंजी येथे शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली जाईल, असे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले. तसंच अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी पोलीस प्रशासन याबाबत उचित कारवाई करणार असल्याचंही आश्वासन दिलं.

सोमवारी दिवाळीच्या पहाटे रस्त्यावर खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा घृणास्पद प्रकार इचलकरंजी येथे घडला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन या प्रकरणी चार युवकांना ३६ तासात अटक केली. रोहित गजानन जाधव, शुभम भोसले, सौरभ माने, शाकीब अब्दुल शेख या संशयितांना न्यायालयानं बुधवारी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तथापि, शहरात या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आवाज उठवला जात आहे. याच मागणीसाठी आज नागरिकांनी प्रांत कार्यालय येथे मोर्चा काढला.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांच्यामार्फत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चातील अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. तसंच यावेळी सर्वांकडून चारही जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. मोर्चामध्ये सहभागी महिलांनी ‘आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे’ असे पोस्टर, बॅनर दाखवून आरोपींचा निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आंदोलकासमोर बोलताना अधिकाऱ्यांनी आरोपींची खैर केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली जाईल, असे सांगितले.