News Flash

कोल्हापूर : महापौर आजरेकरांकडून निधीचा गैरवापर; भाजपाचा गंभीर आरोप

याविरोधात आंदोलन उभारणार असल्याची घोषणा

कोल्हापूर : महापौर आजरेकरांकडून निधीचा गैरवापर; भाजपाचा गंभीर आरोप
निलोफर आजरेकर, महापौर, कोल्हापूर

महापौर निलोफर आजरेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेवर काम करण्याकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात ३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. तसेच या बेकायदेशीर कामासाठी महापौरांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

ठाणेकर म्हणाले, “महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एखाद्या महापौरांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेतील कामाकरिता सार्वजनिक निधीची तरतूद करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या सभेत मांडलेलेल्या अंदाजपत्रकात सभेमध्येच या कामाच्या मंजुरीची सही करून महापौरांनी दुसरा इतिहास रचला. तसेच याच्या अंमलबजावणीचे तातडीने आदेशही प्रशासनाला दिले.”

अपात्र ठरवण्यासाठी कार्यवाही

महापौरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खाजगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीचा वापर करणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. महापौरांनी अशाप्रकारे बेकायदेशीर काम केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका आधिनियमानुसार त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुद्धा भाजपाने सुरू केल्याचे ठाणेकर यांनी सांगितले.

महापौरांविरोधात आंदोलन

महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपाने केली पण सत्ताधारी काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घातले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक निधीचे म्हणजेच त्या संस्थेच्या, जनतेकडून जमा झालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे विश्वस्त असतात हे महापौर विसरल्या आहेत. त्यातही महापौरांच्या सारख्या पदाधिकाऱ्याने सार्वजनिक निधीचा वापर खाजगी कामासाठी करणे हे निषेधार्ह असून त्यांनी जनतेचा विश्वासघातच केला आहे. सात दिवसात महापौरांनी आपला राजीनामा न दिल्यास भाजपा उग्र आंदोलन करेल, असे जिल्हाध्यक्ष चिकोडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 7:00 pm

Web Title: kolhapur misuse of funds by mayor ajrekar serious allegations of bjp aau 85
Next Stories
1 ऊस पट्टय़ात सेंद्रिय शेती लोकप्रिय
2 आठ हजार पोलिसांची लवकरच भरती
3 कोल्हापूर : प्लाझ्मा उपचार प्रक्रिया यशस्वी; आठ करोनाबाधित रुग्ण झाले बरे
Just Now!
X