कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी विक्रमी नोंद झाली. काल मध्यरात्री पासूनची बाधितांची संख्या २७७ झाली. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण इचलकरंजी व कोल्हापूर शहरात आढळले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्णसंख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील करोना प्रतिबंध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असतानाही रुग्णसंख्या वाढतच आहे. काल मध्यरात्रीपासून प्राप्त अहवालानुसार २७७ रुग्ण करोना सकारात्मक आले आहेत. कोल्हापूर शहरात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळले.

तर सर्वाधिक रुग्ण असलेल्या इचलकरंजीत एकाच दिवसात ८० रुग्ण आढळल्याने वस्त्रनगरी हादरली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात आकडा वाढण्याचा पहिला दिवस होता. इचलकरंजीसाठी आजचा दिवस धोक्याची घंटा ठरला. शहरांची संख्या तीनशेहून अधिक झाली आहे. यातील बरे झालेले रुग्ण ६०, तर यातील मयत झालेले १६ आहेत.

शहरातील वेगवेगळ्या भागातील आज नवे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. इचलकरंजी व कोल्हापूर शहरात तसेच ग्रामीण भागातही करोना सकारात्मक रुग्ण वाढू लागल्याने सोमवार पासून टाळेबंदीचा दुसरा टप्पा घोषित केला आहे.