कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी मंगळवारी सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. त्यांना ४३ मते पडली. तर विरोधी भाजपा-ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांना ३२ मते मिळाली. उभय काँग्रेसला साथ देणाऱ्या शिवसेनेने आज पाठ फिरवली. त्यांचे चार सदस्य अनुपस्थित राहिले.

जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ही निवडप्रक्रिया आज महापालिकेत पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता करारानुसार महापौर, उपमहापौर पद दोन्ही पक्ष आलटून पालटून वाटून घेतात. त्यानुसार एक महिन्यासाठी महापौरपदाचा कार्यकाळ उरला असताना हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले आहे. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, तर विरोधी भाजपा-ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेटके यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्तारुढ आघाडीकडे ४३ तर विरोधी आघाडीकडे ३३ नगरसेवकांचे संख्याबळ होते. तर गेली चार वर्षे महापौर निवडणुकीत चमत्काराची घोषणा करणाऱ्या विरोधी भाजपा-ताराराणी आघाडीला यावेळीही पराभवच पत्करावा लागला.

नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आजही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा जनसंपर्क कार्यालयापासून महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात येऊन सभागृहात दाखल झाले. त्यांनी फेटे बांधले असल्याने विजय कोणाचा होणार याचा अंदाज येत होता. त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक थेट सभागृहात आले. पिठासन अधिकारी दौलत देसाई यांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटाची वेळ दिली. उमेदवारी अर्ज कुणीच मागे घेतले नसल्याने उपस्थित नगरसेवकांचे हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यामध्ये लाटकर यांनी विजय मिळवला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात विजयाच्या घोषणा आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.