जातवैधता प्रमाणपत्रास मुदतवाढ

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या  जबर दणक्यामुळे  कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय २० नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली होती, पण आज  राज्य मंत्रिमंडळाने  जातवैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतल्यामुळे या सर्व नगरसेवकांना अभय मिळाले आहे. राजकीय जडणघडणीत निर्माण झालेले विघ्न गणेशोत्सवात मंगळवारी मंगलवार्ता ऐकण्यास मिळाल्याने या नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला. या नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र एक वर्षांच्या आत सादर केले असल्याने त्यांना शासन निर्णयाचा लाभ झाला.

कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली होती. आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे जातीचे दाखले वैध ठरले आहेत, परंतु त्यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यातून जातवैधता प्रमाणपत्र या विषयाने उचल खाल्ली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या २२, तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ११ प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांना जातपडताळणी प्रमाणपत्र पुढील सहा महिन्यांत महानगरपालिकेला सादर करणे गरजेचे होते, पण  १३ नगरसेवकांनीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते.

या २० नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी विभागीय जातपडताळणी समितीसमोर सुरू होती. निवडणूक आयोगाची मुदत संपली तरीही जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र ठरवले होते. त्यावर  त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २४ ऑगस्ट रोजी न्यायालयाने जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने २० नगरसेवकांचे पद रद्द केले. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती.

यानंतर  नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांनी ६ महिन्यांच्या कालावधीपेक्षा जास्त आणि १२ महिन्यांच्या आत  जात प्रमाणपत्र पडताळणी सादर  केले आहे त्यांचे नगरसेवकपद कायम राहणार आहे, असा निर्णय घेतला आहे . यामुळे कोल्हापूरच्या २० नगरसेवकांना लाभ होणार आहे.

यांना मिळाले जीवदान

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकाचे पद रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी करत महापालिका प्रशासनाने त्यांना महापालिका कामकाजात तसेच सभेत सहभागी होण्यास मज्जाव केला होता, पण शासन निर्णयामुळे  काँग्रेसच्या माजी महापौर अश्विनी रामाणे, माजी महापौर स्वाती यवलुजे, राष्ट्रवादीच्या माजी महापौर  हसीना फरास, माजी उपमहापौर शमा मुल्ला, भाजप- ताराराणी आघाडीचे गटनेते किरण शिराळे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक सुभाष बुचडे, रीना कांबळे, अफजल पिरजादे, संदीप नेजदार, वृषाली कदम, दीपा मगदूम, सचिन पाटील तर भाजप-ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे,अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील,मनीषा कुंभार, नीलेश देसाई, संतोष गायकवाड आणि शिवसेचे नियाज खान यांना जीवदान मिळून पुन्हा नगरसेवक म्हणून काम करता येणार आहे .