पूर्वसूचना न देता जकात ठेका काढून घेतला

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील फेअरडील कंपनीचा जकात ठेका पूर्वसूचना न देता काढून घेतल्याबद्दल या कंपनीस ठेक्याची रक्कम आणि त्यावरील व्याज असे सुमारे १२४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम कंपनीला द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाने दिला आहे.

कोल्हापूर महापालिकेचा जकात ठेका फेअरडील कंपनीकडे होता. महापालिकेने कंपनीचा जकात ठेका कंपनीला पूर्वसूचना न देता १९९७ साली काढून घेतला. तेव्हापासून लवादासमोर या वादाची सुनावणी सुरू होती. याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.  एन. परिअव्वा यांच्या लवादाने दिला. हा आदेश ५ एप्रिल रोजी महापालिकेला अधिकृत इमेल द्वारे प्राप्त झाला आहे.

फेअरडील कंपनीला ठेका मिळाल्यानंतर वसुलीच्या दरम्यान झालेल्या काही घटनांच्या पाश्र्वभूमीवर जनतेत रोष निर्माण झाला होता. तRोरीही झाल्या होत्या, त्यामुळे महापालिकेने कंपनीचा जकात ठेका रद्द केला होता. त्यानंतर कंपनीने आपले २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले म्हणून लवादाकडे धाव घेतली होती. त्यानंतर  २२ वर्षे त्याची सुनावणी सुरू होती. लवादाने नुकसान भरपाईची रक्कम २५ कोटी वरून २४ कोटी केली.  या २४ कोटींवरील  २२ वर्षांंचे व्याज असे एकूण १२४ कोटी रुपये महापालिकेने कंपनीला द्यावेत असा निर्णय लवादाने दिला.

या निर्णयाबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी आपल्याला हा आदेश प्राप्त झाला असून याबाबत विधी तज्ज्ञांशी चर्चा करून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे सोमवारी सांगितले.