अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी असोसिएशनकडून महापालिकेच्या चौकात निदर्शने

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घ्यावी, तेथील भूखंडाचे विभाजन करण्याचा ठराव विखंडित करावा, या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी असोसिएशनने महापालिकेच्या चौकात निदर्शने केली. त्याबाबतची अंमलबजावणी न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.

जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कोल्हापूर हे चित्रपट सृष्टीचे माहेरघर आहे. अशा या शहरातील जयप्रभा स्टुडिओचे जतन व संवर्धन केले जावे,अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे या जागेच्या मालक लता मंगेशकर यांच्यावतीने त्यांचे वटमुखत्यार मेजर यादव यांनी बांधकाम करण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव महापालिकेकडे दाखल केला आहे. रामसिन्हा विकसक यांच्यावतीने येथे

बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो थांबवण्यात येऊन कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा जतन करावा, अशी मागणी आज या आंदोलनावेळी करण्यात आली.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक भूपाल शेटे, नगरसेविका सुरेखा शहा, नितीन पाटील, लहुजी शिंदे, तानाजी मोरे यांच्यासह चित्रपट कलाकारांनी निदर्शने केली. या मागणीचे निवेदन महापालिकेचे सहायक अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले.