कोल्हापूर : आर्थिक पातळीवर हेलकावे खाणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेने कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल ५ कोटींची रक्कम भरलेली नाही. परिणामी भविष्य निर्वाह निधीच्या वतीने महानगरपालिकेची दोन बँक खाती सील करीत महापालिकेची अर्थकोंडी केली आहे.

भविष्य निर्वाह निधी विभागाचे कोल्हापूर क्षेत्रीय आयुक्त सौरभ प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले, महानगरपालिकेकडील कंत्राटी आणि रोजंदारी कामगारांची जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०१२ या कालावधीची भविष्य निधीची रक्कम भरली नाही. याबाबत महापालिकेच्या विरोधात कलम ७ ए अनुसार २७ सप्टेंबर २०१२ पासून कारवाई सुरु होती.

महापालिकेचे ढिम्म प्रशासन

क्षेत्रीय भविष्यनिधी आयुक्त यांनी सुनावणीत ३४ वेळा तहकुबी देऊ न महापालिकेला संधी देऊनही रक्कम भरली नाही. १८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल देताना प्रलंबित रक्कम त्वरित भरण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाने याही बाबतीत टाळाटाळ केली. यासाठी भविष्यनिर्वाह निधी संघटनेमार्फतही पाठपुरावा केल्यावर महापालिका आर्थिक अडचणीत असल्याचे कारण पुढे करून केंद्रीय औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने महापालिकेला निर्धारित रकमेच्या ४० टक्के म्हणजे १ कोटी ९० लाख रुपये इतकी रक्कम एक महिन्यात म्हणजेच १७ नोव्हेंबर पूर्वी भविष्यनिधी आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले. महापालिकेने मुदतीमध्ये रक्कम भरली नाही नसल्याने भविष्यनिधी आयुक्त यांचेकडून महापालिकेची आयडीबीआय बँक, शिवाजी चौक शाखा आणि बँक ऑफ महाराष्ट्र, फोर्ड कॉर्नर शाखा येथील बँक खाती स्थगित रकमेच्या वसुलीसाठी सील केली.

कर्मचाऱ्यांना दिलासा

महानगरपालिकेकडून र्मचाऱ्यांची रक्कम भविष्यनिर्वाह निधीकडे रक्कम भरली गेल्यावर कर्मचाऱ्यांचे नाव आधार कार्ड आदी पुराव्यासह विवरण पत्रही दाखल होणे आवश्यक आहे. ते दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिधी खात्यावर रक्कम जमा होणार आहे, असेही आयुक्त प्रसाद यांनी सांगितले.