कोल्हापुरातील शुभकार्याचे आता महापालिका चित्रीकरण करणार आहे. ५० लोकांच्या उपस्थिती नियामांचे उल्लंघन झाल्यास कार्यालय चालकावर आणि विवाहसमारंभ आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विवाहासह कोणत्याची समारंभासाठी ५० लोकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र याही नियमाच्या पुढे जात आता महापालिकेने समारंभासाठी उपस्थित सर्वांची नावे व संपर्क क्रमाकांची यादी मंगल कार्यालयांने महापालिकेला देणे बंधनकारक केले आहे.

लग्नाची बेडी ऐवजी कायद्याची बेडी

महापालिकेने या मोहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. महापालिकेचे पथक प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्रीकरण करणार आहे. ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास कार्यालय चालकावर व विवाह समारंभ आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन लग्न समारंभात लग्नाची बेडी पडण्याऐवजी कायद्याची बेडी पडण्याची वेळ यजमानांवर येऊ शकते.

कार्यवाही सुरू

रुईकर कॉलनी येथील राजगौरव मंगल कार्यालय येथे विनापरवाना लग्न समारंभ आयोजित केल्याबद्दल संबंधीत कार्यालय मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांनी व मंगल कार्यालयांनी समारंभ करताना सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

बड्यांना मुभा, छोट्यांना बेडी

५० लोकांच्या उपस्थितीत समारंभ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र यातही प्रशासन ढवळाढवळ करीत असल्याची नागरिकामध्ये जोरदार चर्चा आहे. बड्या लोकांच्या घरचे कार्य असले की डोळेझाक आणि गरिबांवर कारवाईची कुऱ्हाड असा भेदभाव केला जात आहे. चंदगड तालुक्यात काजू व्यापारी, इचलकरंजी येथे माजी नगरसेवक आदी ठिकाणी वाजत गाजत शेकडो लोकांच्या उपस्थितीत शुभमंगल पार पडले. मात्र, प्रशासनाला याचा पत्ताच नसल्याने सोशल मीडियातून याची खिल्लीही उडवण्यात आली.