|| दयानंद लिपारे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बार दिवाळीत उडणार असला तरी आतापासूनच राजकीय आपटबार दणका देऊ लागले आहेत. कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी सत्तेवर आहे. तर त्याच्याविरोधात असलेल्या भाजपने आगामी निवडणुकीत महापालिकेवर झेंडा फडकवण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक हे तिन्ही नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केली असून सत्तेतील काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे. भाजपच्या सोबत असलेली आणि महाडिक यांची छाप असलेली ताराराणी आघाडी ही आता भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक तुल्यबळ होईल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये लागला. राज्यात भाजप सत्तेवर असताना सत्ता टिकवणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान होते. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारत सर्वाधिक २९ नगरसेवक निवडून आणले. तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रिफ यांनी १५ जागांवर पक्षाला विजय मिळवून दिला राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली होती, भाजपला १५ तर आघाडीला १९ जागांवर विजय मिळाला. शिवसेनेचे चार तर तीन अपक्ष निवडून आले. ८१ सदस्यांच्या सभागृहात निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता मिळवली. त्याला पुढे शिवसेनेने साथ दिली.

मोर्चेबांधणी आणि वाकयुद्ध

आगामी निवडणूक ही पुन्हा एकदा गत वेळेप्रमाणे स्वबळावर होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळावा होऊन त्यामध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी या यंत्रणेवर लक्ष ठेवले आहे. पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसचे संख्याबळ गत वेळेपेक्षा अधिक वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन चालवले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी पक्षाला भरीव यश मिळविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. याचवेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नपूर्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा, जिल्हा परिषद येथे अपयश आल्याने कसर भरून काढण्याची त्यांची रणनीती आहे. निवडणुकीची सूत्रे त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवली आहेत. महापालिकेतील एका छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या महापालिकेतील कारभारावर जोरदार टीका केली होती.

४५० कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी नळपाणी योजना सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता न आल्याने त्यावर ताशेरे ओढले होते. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महापालिकेतील नेतृत्वाने  उत्तर दिले. पालकमंत्री पाटील यांनी महाडिक यांच्यावर टीकास्त्र डागले. कोल्हापुरातील प्रवेशद्वारावर होणारा महाडिक यांचा कथित ‘बास्केट ब्रिज’ प्रकल्प कोठे गेला? असे म्हणत निशाणा साधला आहे. यातून आतापासूनच पाटील- महाडिक यांच्यातील जुगलबंदी रंगू लागली आहे. महाडिक यांच्या ताब्यातील गोकुळ दूध संघ व राजाराम साखर कारखाना यांच्या निवडणुका झाल्यानंतर आणि मुश्रिफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापालिकेच्या कुरुक्षेत्राला आणखी खरा संघर्ष येणार आहे. तोपर्यंत दोन्ही गटांकडून वाक्युद्ध भडकू लागले आहे.

अव्याहत संघर्ष

महापालिकेची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले गेल्याने सुरुवातीपासूनच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक महापौर निवड चमत्कार होईल अशी भाषा केली होती. त्याचा मोठा दबाव काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राहिला होता. अशातच सर्वोच्च न्यायालयाने जात पडताळणीप्रकरणी ऑगस्ट २०१८ मध्ये दिलेल्या निकालामुळे सत्तारूढ व विरोधी असे दोन्हीकडील २० नगरसेवकांवर कुऱ्हाड कोसळली होती. पुढे हे प्रकरण शासनाने सावरून घेतले. चंद्रकांत पाटील यांची भूमिका यामध्ये निर्णायक ठरली. महापालिकेत पुरेसे संख्याबळ असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीने अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्यासाठी पदांची ‘खांडोळी’ केली. चार-सहा महिन्यांसाठी महापौर निवडला गेल्याने पदाची अप्रतिष्ठा होत राहिली. मात्र यातून सत्ता संतुलन राखणे त्यांना सोपे गेले.