दयानंद लिपारे

महापालिका निवडणूक म्हणजे प्रशासनाचा गोंधळ, त्यावरून होणारे आरोप-प्रत्यारोप, ताणले जाणारे मतभेद हे जणू सूत्रच बनले आहे की काय, अशी स्थिती कोल्हापुरात निर्माण झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असताना त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी शेकडोंच्या संख्येने महापालिका प्रशासनाकडे सादर झाल्या आहेत. त्यावरून रंगलेली टीकाटिपणी पाहता नांदीलाच निवडणुकीचा तमाशा रंगण्याची होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

मागील महापालिका निवडणुकीवेळी ही असाच प्रकार घडला होता. सन २०१५ मध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात प्रारुप मतदार यादीचे कामकाज सुरू होते. तेव्हा मतदार यादी, प्रभाग रचना आणि आरक्षण प्रभाग या तिन्ही टप्प्यावरील प्रक्रिया वादग्रस्त बनली होती.  एका प्रभागातील मतदान अन्यत्र वळवले जाणे, नावे गायब होणे असे प्रकार घडल्याने महापालिका प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर नागरिक, नगरसेवक, राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.  आता संशयाची सुई ही सत्तारूढ गटाकडे आणि मंत्र्यांकडे सरकलेली आहे. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची सत्ता आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर गटाच्या समर्थकांनी ‘मतदार यादीमध्ये राजकीय घोळ आहे. मंत्र्यांच्या इशाऱ्याने या गोष्टी घडल्या आहेत,’ असा आरोप केला आहे. शिवसेनेकडून हा प्रकार आरोप झाल्याने महाविकास आघाडीला सावध पवित्रा घ्यावा लागला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी अध्यक्ष राजेश लाटकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सदोष मतदार यादी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.

यातील दोष दूर करण्याची गरज व्यक्त करत मुश्रीफ यांनी याबाबत महापालिकेला निर्देश दिले. राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे मतदार यादीतील गोंधळाकाडे लक्ष वेधून उणीवा दूर करण्याची मागणी केली आहे.

यादीचा गोंधळ..

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत गोंधळच गोंधळ असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने शहरातील ८१ प्रभागासाठी १५ जानेवारी पर्यंत प्रसिद्ध केलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे मतदारांचे विभाजन करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यावेळच्या निवडणुकीसाठी काही प्रभागातील मतदारांची संख्या पाच हजारापर्यंत तर काहींची नऊ हजारापर्यंत झाली आहे. त्यामध्ये  त्रुटी जाणवत असल्याने तक्रारींचा मारा सुरू झाला आहे. याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रारूप मतदार यादी बनवणारे अकार्यक्षम उपशहर अभियंता यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तत्पूर्वी, त्यांनी उपायुक्त निखील मोरे यांना निवेदन दिले. पण प्रशासनाने दखल घेतली नाही. भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी महापालिका प्रशासन स्वत:च्या चुकीमुळे नागरिकांच्या मतदानाचा मुलभूत हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप केला आहे.

प्रशासनाला उपरती..

चौफेर टीकेचा मारा सुरु झाल्यावर सुस्त, बेशिस्त प्रशासनाला आता उपरती आली आहे. उपायुक्त अडसूळ यांनी याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचे मान्य केले आहे. सर्व हरकती पूर्ण का सोडवल्या जातील महापालिकेच्या सीमारेषा न वरील सर्व मतदारांची छाननी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मतदारांचे यादीतील गोंधळ निस्तरण्यासाठी चारही विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा पाचशे जणांचा चमू याच कामांमध्ये आता गुंतला आहे. मतदाराची तपासणी (व्हेरिफिकेशन) करण्याचा निर्णय घेतला आहे. हरकतींची शहनिशा करण्याचे आदेश आयुक्त बलकवडे यांनी दिले आहेत.